|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सरपिराजी तलाव पाणलोट क्षेत्रात प्लॉटींगः

सरपिराजी तलाव पाणलोट क्षेत्रात प्लॉटींगः 

वार्ताहर/ मुरगूड

मुरगूड शहरासह शिंदेवाडी आणि यमगे या तिन्ही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱया पाणलोट क्षेत्रात सध्या दौलतवाडीकडील बाजूला प्लॉटींगचे काम जोरात सुरू झाले आहे. या क्षेत्रात मनुष्यवस्ती झाली तर या वस्तीचे सांडपाणी थेट पाणी या तलावात उतरणार आहे. त्यामुळे तलाव प्रदुषणास खुले आम आमंत्रण देण्याचा प्रयत्न होत आहे. मंगळवारी सकाळी हे काम मुरगूडमधील कांही जागरूक नागरिकांनी बंद पाडले. दरम्यान तलाव प्रदुषणाचे कोणतेही प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत. प्रसंगी जनांदोलन उभा करू, असा इशारा मुरगूडमधील नागरिकांनी दिला आहे.

मुरगूडसह 15 ते 17 हजार लोकवस्तीला मुबलक शुध्द पीण्याच्या पाण्याचा पुरवठा सरपिराजी तलावातून अव्याहत होतो. नैसर्गिक पध्दतीने या तलावात पाणी साठत असल्याने या तलावाला कधी प्रदूषणाने ग्रासले नाही. नैसर्गिक पाणलोट क्षेत्रामुळे पीण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱया मुरगूड, यमगे व शिंदेवाडीस कधीही पाण्यापासून होणाऱया साथीच्या रोगासारख्या संकटाला सामोरे जाण्याचा प्रसंग उद्भवलेला नाही. निसर्गरम्य वातावरण असणाऱया तलावाला कोणत्याही प्रदुषणाचा विळखा बसलेला नाही. पण अधिक पैसा मिळवण्याच्या लालसेतून सध्या दौलतवाडी हद्दीतील गट क्र. 96 मधील 1 हेक्टर 54 आर. या जिल्हाधिकाऱयांनी आरक्षित केलेल्या जमिनीवर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात भरमसाठ दराने नागरी वस्तीसाठीचे प्लॉटींगकाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

वस्तूतः या पाणलोट क्षेत्रातील शेतीचे क्षेत्र हे केवळ पिकनिर्मितीसाठी असल्याचा ठळक उल्लेख सातबारा उतारा व अन्य संबंधित कागदपत्रावर आहे. असे असताना  प्लॉट पाडण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. वेळीच यावर बंधन घातले नाही तर स्वच्छ सरपिराजी तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडेल. म्हणूनच मंगळवारी या परिसरात चाललेले प्लॉटींगचे काम लोकांनी बंद पाडले.

दरम्यान शहरातील अन्य जागरूक नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पालिकेत भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली. दौलतवाडी या छोटय़ा वस्तीचेही तलावात येणारे पाणी थांबवण्याची गरज असताना या नव्या समस्येची भर पडणार आहे. सरपिराजी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मनुष्यवस्ती वाढून प्रदुषण होऊ नये यासाठी या क्षेत्रात नागरी वस्ती बांधकाम अथवा प्लॉटींगला बंदी आणावी असा मुरगूड नगरपालिका तसेच शिंदेवाडी आणि यमगे ग्रामपंचायतीतही ठराव करावा अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे. मुरगूडचे जागरूक  नागरिक सुरज गायकवाड यांनी याप्रश्नी वैयक्तिक आंदोलन उभारण्याचा इशारा शहरवासियांच्या सहय़ा असलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. त्याच्या प्रति जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पालकमंत्री, मुरगूड नगराध्यक्ष व तलावप्रशासनाकडे दिल्या आहेत.

 दरम्यान दौलतवाडीचे माजी सरपंच सर्जेराव कानडे याप्रश्नी म्हणाले, दौलतवाडीत यापूर्वी पाझर तलाव पाणलोट क्षेत्रात उभारताना मुरगूडसह तिन्ही गावांनी  आम्हाला विरोध दर्शवला होता. आता संभाव्य प्रदुषणाचा विचार करता अशा प्लॉटींग कामाला किती ताकदीने ही गावे विरोध करतात हे आम्हाला पहायचे आहे.

               ओढय़ावर आक्रमणाचा प्रयत्न!

दौलतवाडी ते सरपिराजी तलावादरम्यान एक ओढा आहे. पावसाळय़ात दौलतवाडी, अवचितवाडी, करंजिवणे आदी डोंगरातून या ओढय़ातूनच हे पाणी थेट सरपिराजी तलावात उतरते. हा ओढा या प्लॉटींग एरियातून जातो. या तलावाची दिशा पुढे ढकलण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

Related posts: