|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लांजा नगराध्यक्ष संपदा वाघधरे अपात्र

लांजा नगराध्यक्ष संपदा वाघधरे अपात्र 

प्रतिनिधी / रत्नागिरीअनधिकृत बांधकामाचा आरोप शाबित झाल्याने लांजाच्या नगराध्यक्षा सौ.संपदा योगेश वाघधरे यांना सदस्यपदावरुन अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी शुक्रवारी दिला. हा आदेश जारी होताच तत्काळ प्रभावाने कार्यवाहीत आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

लांजा नगरपंचायतीचे सदस्य सुनील नारायण कुरुप यांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार अर्ज दिला होता. तेथील नगराध्यक्षा सौ.संपदा योगेश वाघधरे यांच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवर वाघधरे यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. उभय बाजू ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी 4 मे रोजी निर्णय दिला.

या निर्णयामध्ये जिल्हाधिकाऱयांनी नमून केले की, संपदा योगेश वाघधरे यांना नगरपंचायतीच्या सदस्य म्हणून काम करण्यासाठी उर्वरित कालावधीसाठी पद धारण करण्यास अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यांचे नगर पंचायत सदस्यपद या आदेशान्वये रिकामे झाल्याचे जाहीर करण्यात येत आहे.

सुनील नारायण कुरुप हे लांजा नगर पंचायतीचे सदस्य असून त्यांनी सौ. वाघधरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताना लांजा रेस्ट हाऊसनजीकच्या योगेश वाघधरे यांच्या जमिनीतील अनधिकृत बांधकामाविषयी पुरावे गोळा केले. पंचनामा, व्हिडीओ रेकॉर्डींग, नगरपंचायत पथकाचा पंचनामा आदी सर्व बाबी तक्रारीसोबत जोडल्या होत्या. तक्रारीसोबतच सारे पुरावे सादर केले होते. लांजा रेस्ट हाऊसनजीक असलेले आक्षेपित बांधकाम सध्या बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.

सौ.संपदा वाघधरे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे सादर केलेल्या आपल्या बचावात नमूद केले की, आपल्या मालकीची जमीन होती, ही बाब खरी आहे. मात्र त्याची विक्री करण्यात आली असून अन्य व्यक्तीने त्यात काही बांधकाम केले असेल तर ते माझ्या माहितीत नाही, तसे बांधकाम आपण केलेले नाही. यामुळे आपल्याला अपात्र ठरवण्यात येऊ नये. वाघधरे यांनी आपल्या बचावासाठी काही दस्तऐवज सादर केले. सौ. वाघधरे या सध्या नगराध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांचा नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा पदावधी आहे. हा कालावधी संपण्यासाठी 4 महिने बाकी आहेत. तोच जिल्हाधिकाऱयांचा निर्णय आला. जिल्हाधिकाऱयांच्या निर्णयाविरुद्ध वाघधरे या अपिलीय प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात, असे सांगण्यात आले.