|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » समस्या निराकरणासाठी भाजपची विस्तारक योजना!

समस्या निराकरणासाठी भाजपची विस्तारक योजना! 

कणकवली : पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त 25 मे ते 10 जूनपर्यंत तालुक्यात विस्तारक योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गंत भाजपचे विस्तारक तालुक्यातील पं. स. गणनिहाय 16 व कणकवली शहरात एक मिळून एकूण 17 विस्तारक गावात राहून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच भाजप सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया योजना जनतेपर्यंत पोहचून प्रलंबित समस्यांचा डाटा एकत्र करून सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यात शत प्रतिशत भाजप निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी आम्हाला कुणा नेत्याची गरज नाही, असे सांगत नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला भाजप नेते संदेश पारकर यांनी अप्रत्यक्ष विरोध दर्शविला.

येथील प्रमोद जठार संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन तेली, प्रदेश सदस्या प्रज्ञा ढवण, तालुकाध्यक्ष रवींद्र शेटय़े, डामरे सरपंच बबलू सावंत, संतोष पुजारे आदी उपस्थित होते. या विस्तारक योजनेंतर्गत वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, रोजगार आदी प्रश्नांबाबत माहिती एकत्र करण्यात येणार आहे. प्रलंबित प्रश्नांचा केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये समावेश करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या देशपातळीवरील योजनेत पक्षाध्यक्ष अमित शहादेखील सहभागी होणार आहेत. भाजपचे जिह्यातील प्रमुख पदाधिकारी जिह्यात निरीक्षक व समन्वयक म्हणून काम करणार आहेत. कणकवली तालुक्याचे निरीक्षक म्हणून तालुकाध्यक्ष रवींद्र शेटय़े व डामरे सरपंच बबलू सावंत यांच्यावर या योजनेची निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

जि. प. मतदारसंघनिहाय योजनेचे पालक सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. भाजप पक्षसंघटनात्मक कामाला उभारी देण्याचा यातून प्रयत्न करण्यात येणार आहे. भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांनीही या योजनेत सहभागी व्हावे. या योजनेबाबत नुकतेच प्रशिक्षण शिबीरही झाले. पं. स. निवडणुकीत कणकवली तालुक्यात आम्ही कमी पडलो. या ठिकाणी पक्ष संघटनेची बांधणी करण्यात येणार आहे. अवकाळी पावसाच्या सुरुवातीलाच तालुक्यात ठिकठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. ही सर्व चुकी ‘बीव्हीजी एजन्सीची आहे. या एजन्सीच्या गोंधळामुळे तालुक्यातील कामे प्रलंबित असल्याचे तेली व पारकर यांनी सांगितले. तर शेती पंपाच्या वीजबिल दरवाढ शासनाने मान्य केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कणकवलीतील पाणीटंचाईच्या कामांतंर्गत विंधन विहिरींच्या केवळ पाचच कामांना मंजुरी मिळाली. ही कामे मंजुरीची जबाबदारी जि. प. ची आहे. टंचाईबाबत जर जि. प. ने योग्य नियोजन केले असते तर टंचाईची परिस्थिती उद्भवलीच नसती. यावर्षी बंधारे कमी झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. राज्य सरकार यापुढे जलसंधारणाच्या कामातून गावनिहाय बंधारे बांधणार आहे. तसेच नद्यांवर ब्रिजकम बंधारे बांधण्याबाबत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. पाणीटंचाईतील कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करण्यात येईल. विशेष कार्यकारी अधिकारी पदांवरील नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या सुक्ष्म निरीक्षणामुळे रखडल्या आहेत. सर्व शासकीय समित्या कार्यान्वीत करण्याचीही मागणी करण्यात येणार असल्याचे श्री. तेली यांनी सांगितले.

जास्त उपोषणे सावंतवाडीत!

शिवसेनेचे पालकमंत्री हे केवळ सावंतवाडीचे नसून, ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिह्याचे आहेत. जिह्यात वैभववाडी, कणकवली आदी तालुके आहेत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. 1 मे रोजी जिह्यात सर्वांत जास्त उपोषणे पालकमंत्र्यांच्या सावंतवाडीतच झाली. यावर्षी शासनाने जिल्हा नियोजनला एकरकमी 170 कोटींचा निधी दिला. या निधीचे नियोजन करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची होती, असे श्री. तेली यांनी सांगितले.