|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शेतमाल खरेदीचे हंगामपूर्व धोरण ठरविणार

शेतमाल खरेदीचे हंगामपूर्व धोरण ठरविणार 

खरीप हंगामात येणारा शेतमाल आणि त्याची सरकारकडून करण्यात येणारी खरेदी यासंदर्भात हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोरण ठरविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बुलडाणा येथे दिली. सरकारकडून खरेदी करायच्या शेतमालाची माहिती शेतकऱयांना आधीच मिळाल्यामुळे शेतकरी तसे नियोजन करतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बुलडाणा जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जलयुक्त शिवार अभियानातील सन 2016-17 या  वर्षातील कामे त्वरीत पूर्ण करावीत. सर्व कामाचे जिओ टॅगींग करून अक्षांश रेखांश अपलोड करावेत. हे झाल्यानंतरच काम पूर्ण झाल्याचे समजण्यात येईल. मागेल त्याला शेततळे योजनेतील शेततळय़ांचे काम दर्जेदार करावीत. तसेच मार्च 2016 पूर्वीच्या कृषिपंपाचे पेड पेंडिग वीजजोडण्या त्वरीत पूर्ण कराव्यात. स्वच्छता अभियान ग्रामीण आणि नागरी क्षेत्रात प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

खारपाण पट्टय़ासाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प

खारपाण पट्टय़ातील शेतीला डार्क झोनमधून काढून शेतीची सुपिकता वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. कृषि समृध्द प्रकल्पाच्या माध्यमातून खारपाण पट्टय़ातील मातीत बदल घडवून आणण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारून शेतकऱयांना व्यवस्थित शेती करता यावी यासाठी प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे, आकाश फुंडकर, संजय रायमूलकर, राहुल बोंद्रे, शशिकांत खेडेकर आदी उपस्थित होते.

Related posts: