|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मोर्वे येथे निरामाई पाण्याचे पूजन

मोर्वे येथे निरामाई पाण्याचे पूजन 

प्रतिनिधी/ खंडाळा

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून निरा- देवघरचे पाणी अखेर तालुक्यातील वाघोशीपर्यंत पोहोचले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत निरामाईच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. 

निरा-देवघर लाभक्षेत्रातील भोळी, शेखमिरवाडी, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, मोर्वे, वाघोशी, कराडवाडी, अंदोरी, भादे या गावातील ग्रामस्थांनी कालव्याव्दारे पाणी मिळावे म्हणून खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्या सहकाऱयाने पाण्यासाठी लढा उभारला होता. तर कालव्याचे काम, वितरिका पूर्ण कराव्यात या मागण्यासाठी वारंवार निरा-देवघर कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांना निवेदन देत पाठपुरावा केला जात होता.

निरा देवघर या कालव्याची व वितरिकांची कामे पूर्ण करुन 26 एप्रिलला वाघोशीपर्यंत प्रवाहित करण्यात यावा, अन्यथा महामार्गावरील पंढरपूर फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले जाईल, असा इशारा खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला होता. अकरा गावच्या ग्रामस्थांचा पाठपुराव्याची दखल घेत मोर्वे येथील ओढय़ावर सिमेंट पाईप टाकून कालव्याव्दारे पाणी वाघोशीपर्यत पोहचले. दरम्यान, शुक्रवारी मोर्वे येथे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट, सरपंच मिनाक्षी धायगुडे यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता गुंजन करंडे, डॉ. विजय शिंदे, नंदकुमार धायगुडे, नितीन ओव्हाळ, सुनिल धायगुडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

निरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत पोहोचल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या पाण्यामुळे क्षेत्र ओलिताखाली येणार असून येथील शेतकऱयांना फायदा होणार आहे.

Related posts: