|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आक्षेपार्ह बॅनरमुळे मालवणमध्ये संताप

आक्षेपार्ह बॅनरमुळे मालवणमध्ये संताप 

मालवण : शहरात सोमवारी तीन ठिकाणी ‘किल्ला विकणे आहे’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याने शिवप्रेमींत संतापाची लाट उसळली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच सकाळीच बॅनर हटविले. मात्र, किल्ल्यासंदर्भात झळकलेल्या बॅनरबद्दल शिवप्रेमींतून तीव्र प्रतिक्रिया उमटली. बॅनर लावणाऱया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेक शिवप्रेमींनी पोलिसांकडे केली.

सोमवारी सकाळी शहरातील समीर म्हाडगूत फोटो स्टुडिओ नाका, तारकर्ली मार्गावरील भरड नाका आणि एसटी स्टॅण्ड अशा तीन ठिकाणी हे आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यावर ‘किल्ला विकणे आहे, संपर्क-उसनी प्रेरणा समिती व संबंधित’ असे लिहिले होते. बॅनरवर किल्ल्याचीही प्रतिमा होती. मॉर्निंग वॉक करणाऱया नागरिकांनी हे बॅनर पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने किल्ले प्रेरणोत्सव समितीला याची कल्पना दिली. समितीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शहरातील वातावरण बिघडण्यापूर्वीच सर्व बॅनर जप्त करून तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत बॅनर लावणाऱयांचा शोध सुरू होता.

सिंधुदुर्गची शान असलेल्या किल्ले सिंधुदुर्गशी संबंधित आक्षेपार्ह फलक लावून बदनामी केल्याबद्दल किल्ला वाहतूक सेवा व सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी संघानेही याचा निषेध केला. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनीही या घटनेचा निषेध केला असून या प्रकरणी पोलिसांनी गांभिर्याने तपास करावा, अशी मागणी केली आहे.

किल्ले प्रेरणोत्सव समिती आक्रमक

 किल्ल्याच्या प्रती अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध करणारे काही फलक मालवण शहरात आढळले. शहरात बसविलेल्या ‘सीसीटीव्ही’च्या सहाय्याने बॅनर लावणाऱयांचा शोध लावून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. छत्रपतींच्या किल्ल्याचा अपमान करणाऱया अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून या घटनेचा गांभिर्याने विचार करावा, अशा आशयाचे निवेदन किल्ले प्रेरणोत्सव समितीतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांना देण्यात आले. यावेळी प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, सचिव विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, ज्योती तोरसकर, हेमंत वालकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते.

 बॅनर लावणाऱयांवर कारवाई झालीच पाहिजे!

  विजय केनवडेकर म्हणाले, ‘किल्ले सिंधुदुर्ग राष्ट्रीय स्मारक व्हावे, याच उद्देशाने प्रेरणोत्सव समिती काम करीत आहे. प्रेरणोत्सव समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे किल्ले सिंधुदुर्गला निधी उपलब्ध झाला आहे. श्रेयवादासाठी प्रेरणोत्सव समिती काम करीत नाही. परंतु किल्ले सिंधुदुर्गचा अवमान करणारे बॅनर लावण्याचे झालेले कृत्य हे चीड आणणारे आहे. बॅनर लावणाऱयांविरोधात गुन्हा दाखल करावा.’ ज्योती तोरस्कर म्हणाल्या, ‘बॅनर लावणाऱयांवर कारवाई न झाल्यास मालवणातील जनतेला संघटित करून आम्हाला आंदोलन छेडावे लागले.’ नगरसेवक गणेश कुशे यांनी बॅनरचे प्रिंटिंग कुठे झाले? हे तपासून सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घ्यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली.

..तर जनआंदोलन छेडू!

 शहरात किल्ले सिंधुदुर्गबाबत आक्षेपार्ह बॅनर लावल्याच्या निषेधार्थ मालवण नगरपालिकेत शिवप्रेमींनी पत्रकार परिषद घेऊन या कृत्याचा निषेध केला. यावेळी गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, गणेश कुशे, ज्योती तोरसकर, हेमंत वालकर, भाऊ सामंत, नगरसेवक पंकज सादये, यतीन खोत, नगरसेविका पूजा सरकारे, प्रसाद सरकारे आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, याबाबत कारवाई न झाल्यास सर्व सेवाभावी संस्थांना एकत्र करून जनआंदोलन छेडण्यात येईल.

चौकशीसाठी पथक नियुक्त

 प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱयांसोबत बोलताना नितीन केराम म्हणाले, शहरात लावण्यात आलेले आक्षेपार्ह बॅनर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तपासासाठी पोलीस पथक नियुक्त केले आहे. सीसीटीव्हीद्वारे बॅनर लावणाऱयांचा शोध घेण्यात येणार आहे. तपास गांभीर्याने करण्यात येणार आहे.

सीसीटीव्हीचा फायदा होणार काय?

शहरातील प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, आक्षेपार्ह बॅनर लावताना सीसीटीव्हीत न येण्याची खबरदारी अज्ञातांनी घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावर हे बॅनर न लावता अंतर्गत रस्त्यांवर बॅनर लावले आहेत. शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

ही वेळ का आली?

वायरी भूतनाथ ग्रामपंचायत हद्दीमध्ये सिंधुदुर्ग किल्ला येत आहे. रविवारी रात्री अज्ञातांनी मालवण शहरात बदनामीकारक व समाजात वातावरण बिघडविण्याच्यादृष्टीने डिजिटल बॅनर लावले आहेत. याबाबत शहरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संबंधितांवर कारवाई करावी. हे बॅनर लावण्यासाठी ही वेळ का आली? याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी वायरी भूतनाथचे सरपंच ललितकुमार वराडकर यांनी केली आहे. त्यांच्यासमवेत महेश लुडबे, साक्षी लुडबे, शाम झाड, भाई मांजरेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल आदी उपस्थित होते.