|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जि.प.आरोग्य सेवक भरतीत ‘बनवेगिरी’

जि.प.आरोग्य सेवक भरतीत ‘बनवेगिरी’ 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात दोन वर्षापूर्वी झालेल्या आरोग्य सेवक (महिला) भरतीमध्ये गोलमाल झाल्याचे पुढे आले आहे. या भरतीसाठी तीन उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्रे ‘बनावट’ असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर प्रकाराची खातरजमा करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर कारवाईची सुत्रे हलणार आहेत. दरम्यान, बनावट कागदपत्रे सादर करणाऱयांमध्ये सांगलीतील 2 तर कोल्हापुरमधील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेतर्फे सन 2015 मध्ये आरोग्य सेवक (महिला) पदासाठी सरळसेवा भरती अंतर्गत उमेदवारांकडून आवेदनपत्रे मागवण्यात आली होती. 7 जागांसाठी झालेल्या या भरतीत अंतिम निवड प्रकियेवेळी उमेदवारांकडून कागदपत्रे तपासण्यात आली. उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्रांची छाननी झाली. प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पुणे येथे सादर करण्यात आली. त्यावेळी पुणे येथून सुरूवातीचा पडताळणी अहवाल पात्र असल्याचा देण्यात आला होता. पण जि.प.मधील चौकस अधिकाऱयांनी त्या पडताळणी अहवालानंतरही तीन उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पुन्हा छाननी केली. त्यावेळी उमेदवाराच्या प्रमाणपत्रांत काहीतरी ‘बनवेगिरी’ असल्याचा संशय बळावला आहे.

त्यानंतर अधिकाऱयांकडून या तीन उमेदवारांची प्रमाणपत्रे पुनःपडताळणीसाठी पुणे येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. या पडताळणीमध्ये या तीन उमेदवारांची प्रमाणपत्रे अपात्र असल्याचा अहवाल देण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. ही प्रमाणपत्रे सादर करणाऱया तीन महिला उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

 

आरोग्य विभाग पुन्हा वादात

जिल्हा परिषद आरोग्य विभागात सन 2013-14 दरम्यान झालेल्या आरोग्य सेवक भरतीमध्ये पेपरफुटीच्या प्रकरणाचा मोठा बोलबाला झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागातील दोन महिला कर्मचाऱयांच्या लाच प्रकरणाने येथील कारभाराला गालबोट लागले होते. या प्रकरणानंतर आता आरोग्य सेवक (महिला) भरतीमध्ये तीन उमेदवारांनी खोटी प्रमाणपत्रे सादर करून प्रशासनाच्या डोळय़ात धुळफेक करण्याचा प्रयत्न केल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

 

Related posts: