|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप आजपासून

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप आजपासून 

साक्षी मलिक प्रमुख आकर्षण, संदीप तोमर, बजरंगकडून भारताला आशा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बुधवारपासून सुरू होणाऱया आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविणारी साक्षी मलिक ही प्रमुख आकर्षण असेल आणि भारताची प्रमुख आव्हानवीरही असेल.

योगेश्वर दत्त, सुशील कुमार, गीता व बबिता फोगट भगिनी यांच्या गैरहजेरीत भारताची मुख्य मदार साक्षी मलिक, संदीप तोमर, बजरंग पुनिया यांच्यावर असेल. गेल्या वषी थायलंडमधील बँकॉकमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने एकूण 9 पदके मिळविली, त्यात एक सुवर्ण, 3 रौप्य व 5 कांस्यपदकांचा समावेश होता. संदीप तोमरने 57 किलो फ्रीस्टाईल गटात भारताला एकमेव सुवर्ण मिळवून दिले होते. भारतीय मल्लांसाठी या वर्षातील ही पहिलीच प्रमुख स्पर्धा असून भारताने 24 सदस्यीय बलवान संघ त्यात उतरवला आहे. फ्रीस्टाईल, महिला व ग्रीको रोमन विभागात प्रत्येकी आठ खेळाडू निवडण्यात आले आहेत.

या स्पर्धेत 112 फ्रीस्टाईल, 103 ग्रीको रोमन व 83 महिला मल्ल 24 सुवर्ण व रौप्य आणि 48 कांस्यपदकांसाठी लढणार आहेत. भारताप्रमाणेच इराण, उझ्बेकिस्तान, कझाकस्तान, किर्गीस्तान, जपान, कोरिया, चीन, मंगोलिया येथील मल्ल अव्वल पदकांसाठी झुंजणार आहेत. येथील केडी जाधव कुस्ती मैदानात पाच दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. 14 मे रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.

साक्षीवर सर्वांच्या नजरा असल्या तरी महिलांच्या 58 किलो फ्रीस्टाईल गटात आशियातील सर्वोत्तम महिला मल्ल खेळणार असल्याने तिला थोडे जड जाण्याची शक्मयता आहे. रिओ ऑलिम्पिकनंतर ती प्रथमच एखाद्या प्रमुख स्पर्धेत सहभागी झाली आहे. ऑलिम्पिकनंतर तिने या वषीच्या सुरुवातीस झालेल्या प्रो रेसलिंग लीगमध्ये भाग घेतला होता. त्यातही तिने दोनच लढती केल्या होत्या. मात्र अलीकडेच लखनौमध्ये घेण्यात आलेल्या निवडचाचणीत तिने चांगले प्रदर्शन करीत मंजूचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला. महिलांमध्ये विनेश व रितू या फोगट भगिनींही खेळणार आहेत. विनेशने 2014 मध्ये राष्ट्रकुल सुवर्ण मिळविले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र तिला गंभीर दुखापत झाल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यानंतर ती प्रथमच पुनरागमन करीत आहे. विनेशने मागील स्पर्धेत 53 किलो गटात कांस्यपदक मिळविले होते. याशिवाय अनिताने 63 किलो गटात कांस्य व प्रियांका फोगटने 55 किलो गटात रौप्यपदक मिळविले होते. गेल्या वेळी रितूचे पदक अगदी थोडक्मयात हुकले होते. यावेळी त्याची भरपाई करण्यासाठी तिचे प्रयत्न असतील.

पुरुषांच्या फ्रीस्टईलमध्ये संदीप, बजरंग (65) व जितेंदर (75) यांच्याकडून भारताला आशा आहेत. साक्षी मलिकचा पती सत्यव्रत कादियन (97) या स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. ग्रीको रोमन हे भारताचे बलस्थान नसले तरी भारतीय मल्ल अनपेक्षित निकाल देऊ शकतील. फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या दोन्ही प्रकारांत मागील दोन वर्षापासून इराण विजेता आहे. सर्वकालीन सर्वाधिक पदके मिळविण्यातही इराण आघाडीवर असून त्यांनी आतापर्यंत 344 पदके पटकावली आहेत. त्यात 175 सुवर्ण, 75 रौप्य, 94 कांस्यपदकांचा समावेश आहे. सांघिक विभागातही इराण आघाडीवर असून त्यांनी आतापर्यंत 34 अजिंक्मयपदे मिळविली आहेत.

भारतीय संघ : पुरुष फ्रीस्टाईल-संदीप तोमर, हरफुल, बजरंग, विनोद, जितेंदर, सत्यव्रत कादियन, सुमित. ग्रीको रोमन-ग्यानेंदर, रवींदर, दीपक, गुरप्रीत, हरप्रीत, अनिल कुमार, हरदीप, नवीन. महिला-रितू, पिंकी, विनेश, साक्षी मलिक, सरिता, दिव्या काक्रन, ज्योती.

Related posts: