|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नवीन पिढीला दृष्टी देणारे उपक्रम सुरु करणार

नवीन पिढीला दृष्टी देणारे उपक्रम सुरु करणार 

प्रतिनिधी / सातारा

4 ऑक्टोबर 2018 पासून रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ होणार आहे. वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या शताब्दी वर्षात रयत शिक्षण संस्थेशी निगडित प्रत्येक घटकाचा सहभाग असेल अशी अपेक्षा आहे. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच नवीन पिढीला दृष्टी देणारे उपक्रम संस्थेमार्फत राबवण्यात येतील. सध्या परिस्थिती झपाटय़ाने बदलत आहे. बेरोजगारीची समस्या वाढत असून त्यामुळे नवीन पिढीला नैराश्य येणार हे लक्षात घेऊन संस्थेने कार्यक्रम हातात घेऊन त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपिठावर प्रा. डॉ. एन. डी. पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, चेअरमन डॉ. अनिल पाटील, आमदार पंतगराव कदम, आमदार दिलीप वळसे-पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सचिव प्रा. गणेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार शरद पवार म्हणाले, येत्या 15 दिवसात या उपक्रमाचा आराखडा दिला जाईल त्यावर मॅनेजिंग कौन्सिलमध्ये चर्चा होऊन आवश्यक ते बदल केले जातील. मूलभूत शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाचे ज्ञान प्रत्येकाला उपलब्ध करुन दिले जाईल. गुणवत्तेसंदर्भात रयत हे महत्वाचे केंद्र असून नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. 

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, कर्मवीरांनी शिक्षणाचे महत्व ओळखून सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले. गेल्या काही दिवसांपासून रयतशी जवळचा संबंध आला असून संस्थेच्या कार्याचा आवाका पाहून आनंद व्दिगुणित झाला आहे. कर्मवीरांनी सर्व शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली असली तरी सर्वंत्र चांगले शिक्षण उपलब्ध करुन देण्याचा पल्ला गाठायचा आहे.

सचिव प्राचार्य गणेश ठाकूर यांनी प्रास्तविकात संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेचे चार टप्प्याचे विवेचन केले. त्यानंतर पहिल्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Related posts: