|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विलासपूर दारूमुक्त करणारच-सरपंच पिसाळ

विलासपूर दारूमुक्त करणारच-सरपंच पिसाळ 

प्रतिनिधी/ गोडोली

विलासपूर ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट 2015 रोजीच्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव केला आहे. सध्या असलेली तीन दारु दुकाने बंद करण्याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली असून कायदेशीर मार्गाने ही दुकाने बंद करण्याचा यशस्वी प्रयत्न करु. संपूर्ण गावाने या मागणीसाठी पाठिंबा दिला असून विलासपूरच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याने ‘दारुमुक्त गाव’ करणार असल्याचा निर्धार सरपंच बाळासाहेब पिसाळ यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.

दारुच्या व्यसनाची भयानकता सर्वत्र दिसू लागल्याने दारु दुकाने बंद करण्याची भावना जिथे दुकान तिथे उफाळून येवू लागली आहे. विलासपूर गावात मुख्य रस्त्यालगत असलेली बिअर शॉपी, वाईन शॉपी, परमीट रुममध्ये मद्यपींची वर्दळ गावची डोकेदुखी ठरली आहे.

रस्त्यात पार्किंग, दारुच्या बाटल्यांचा पडलेला खच, महिला, मुलींना व्यसनी व्यक्तींकडून अवार्च्च भाषेत अवहेलना होत असल्याबाबत पांडूरंग संकपाळ, सुनिता मस्के, ज्योती मांडवे, दौलतबी शेख, अन्य काही ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. पी.डी.वाईन्सच्या मालकाला ग्रामपंचायतीने लेखी समज आणि प्रत्यक्ष बोलवून याबाबत खडे बोल सुनावले.

1 मे रोजीची तहकूब ग्रामसभा 9 मे रोजी पार पडली. सभेत दारुविक्रीबंदीबाबत लेखी मागणी अर्जावर झालेल्या चर्चेनुसार गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येवून निर्णय घेण्यावर एकमत झाले.

रविवार 14 रोजी सकाळी 11 वा. ग्रामपंचायत कार्यालयात गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तीन दुकाने बंद करण्याबाबत कायदेशीर मार्गाने अर्ज, मतदान घेण्यावर चर्चा होईल. त्यानुसार दारुविक्री मुक्त विलासपूर करण्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार शिवेंद्रराजे मित्र समुहाचे अध्यक्ष फिरोज पठाण यांनी दिली.

नगरसेविका धनश्री महाडिक, आशा जाधव, किरण नलवडे, प्रविण जाधव, संजय पवार आदी कार्यकर्त्यांनी यावेळी दारुबंदीसाठी सर्वांनी एकत्र येवून दारुला गावाच्या हद्दीतून हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पी.डी. वाईन्सबाबत रहिवाशांनी सरपंच बाळासाहेब पिसाळ यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. त्या तक्रारी ऐकल्यावर त्या दुकानदाराला ग्रामपंचायतीत बोलावून घेतले. त्याला नागरीकांच्या तक्रारीवरुन कडक समज देवून लेखी पत्र दिले.

दरम्यान, गावात 4601 मतदारापैकीच्या दरम्यान महिला मतदार आहेत. दारुबंदीसाठी मतदान होणार असल्यास 1500 महिलांपैकी निम्म्याहून अधिक महिलांनी त्यावेळी आडव्या बाटलीवर फुली मारावी लागणार आहे. तर ही तिन्ही दुकान एकाच वेळी कायमस्वरुपी बंद होतील.

 

Related posts: