|Thursday, July 27, 2017
You are here: Home » उद्योग » लेखक का लिहितात?लेखक का लिहितात? 

तुम्ही का लिहिता असं विचारलं तर प्रत्येक कवी, लेखक त्याच्या-तिच्या परीने उत्तर देईल. पण दिग्गज लेखकांचे किस्से वाचल्यावर खरोखरच लेखक का लिहितात असा प्रश्न पडतो. जॉन स्टाईनबेक हा प्रथितयश अमेरिकन लेखक 1929 सालापासून लेखन करीत होता. त्याच्या कथांवर डझनभर चित्रपट बनले होते. तो 1960 साली एक खास गाडी आणि सोबतीला चार्ली नावाचा लाडका कुत्रा घेऊन अमेरिकाभर 10,000 मैल हिंडला. अनेकांना भेटला. पण भेटलेल्यांपैकी कोणीही त्याला लेखक म्हणून ओळखल्याची खूण अथवा नोंद नाही. त्याचे प्रवासवर्णन काल्पनिक असल्याचीही शंका काही लोकांनी नंतर व्यक्त केली. आपल्याकडच्या खुशवंतसिंग यांची देखील आठवण होते. नव्याण्णव वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. एकाच वेळी अनेक वृत्तपत्रात आणि अनेक भाषांमध्ये सदर प्रसिद्ध होण्याचे भाग्य त्यांना लाभले. संपादक आणि प्रकाशक त्यांच्यावर फिदा होते आणि मनाजोगते मानधन देत होते. शेवटपर्यंत ते लिहीत होते. अगदी मृत्यूच्या आधल्या वषी त्यांचे खुशवंतनामा हे पुस्तक प्रकाशित झाले. शतायुषी होण्याच्या उंबरठय़ावर असतानाच त्यांचे निधन झाले. आपल्या शेवटच्या एका पुस्तकात खुशवंतसिंग म्हणतात, मला वाचकांची रोज पन्नासेक पत्रे येतात. पण त्यातली निम्म्याहून अधिक कडवट टीका करणारी किंवा शिवीगाळ करणारी असतात. उरलेल्या पत्रात वाचक माझी तोंडदेखली स्तुती करतात आणि मग स्वतःच्या लेखनाला प्रकाशक मिळवून देण्याची गळ घालतात. मराठीत गदिमा आणि पुलंना एकत्र प्रवास करताना भेटलेल्या दोन मान्यवरांनी अजिबात न ओळखल्याचा किस्सा पुलंनी सांगितला आहे.

खरोखर मग लेखक का लिहीत असतील? मनातल्या ज्या गोष्टी अगदी जवळच्या लोकांना बोलून दाखवता येत नाहीत किंवा ज्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांना सांगाव्याशा वाटतात त्या गोष्टी लिहिण्यासाठी… एक मजेदार उत्तर रमेश मंत्री यांच्या एका कादंबरीत आहे. तिचा नायक दैनिकात उपसंपादक आहे. त्याचं नाव दैनिकात सतत छापून येत असतं. तरी तो लिहितच असतो. त्याची प्रेयसी त्याला विचारते, सारखं तू लिहीत असतोस नि ते छापून येईतो अस्वस्थ असतोस, असं का? तो म्हणतो, हे आपल्या नावाचं छापील अक्षर बघण्याचं वेड एकदा लागलं की सुटत नाही. मग ती लाडात येऊन म्हणते, तू माझं नाव देखील ‘अक्षर’ असंच ठेव.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!