|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » विजय मल्ल्या यांना 10 जुलैला हजर करावे

विजय मल्ल्या यांना 10 जुलैला हजर करावे 

सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फरार उद्योजक विजय मल्ल्या यांना 10 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर करावे असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला दिला आहे. मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असून त्यांच्यावर भारतीय बँकांची 9 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाची थकबाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमानाप्रकरणी दोषी ठरविले आहे. मल्ल्या यांना आधीच फरार ठरविण्यात आले असून सरकार त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

मल्ल्यांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करून अवमान केला आहे. त्यामुळे मल्ल्यांची 10 जुलै रोजी न्यायालयात उपस्थिती निश्चित करावी असा आदेश गृह मंत्रालय तसेच भारत सरकारला देत असल्याचे न्यायाधीश आदर्श कुमार गोयल तसेच उदय ललित यांच्य खंडपीठाने बुधवारी म्हटले. मल्ल्यांनी आपल्या मालमत्तेविषयी पूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांनी ब्रिटिश कंपनी डियाजिओकडून मिळालेली 4 कोटी डॉलर्सची रक्कमम आपल्या अपत्यांमध्ये वाटून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे खंडपीठाने म्हटले.

प्रत्यार्पणासाठी अर्ज

मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अलिकडेच ब्रिटनकडे अर्ज केला होता. मल्ल्यांवर एसबीआय समवेत 17 बँकांची 9000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाची थकबाकी आहे. ही रक्कम किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाशी संबंधित आहे.

6 महिन्यांची शिक्षा शक्य

अवमानाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपला बचाव करण्यासाठी स्वतः न्यायालयात हजर राहावे लागते. अवमानाप्रकरणी कमाल 6 महिन्यांची शिक्षा किंवा 2000 रुपयांपेक्षा अधिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Related posts: