|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » युवकांना हस्तकला उद्योगाशी जोडणार

युवकांना हस्तकला उद्योगाशी जोडणार 

सावंतवाडी : हस्तकला उद्योगात मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात हस्तकलेकडे दुर्लक्ष झाले. रोजगारासाठी मोठय़ा उद्योगांवर भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तकला उद्योगातून रोजगार निर्मितीवर भर दिला असून त्यासाठी कौशल्य विकास करून युवकांना हस्तकला उद्योगाशी जोडले जाणार असल्याचे केंद्रीय लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी येथे स्पष्ट केले.

येथील शासकीय विश्रामगृहावर सिंह यांनी अधिकाऱयांशी बांबूपासून बनविण्यात येणाऱया विविध वस्तुंसंदर्भात चर्चा केली. सिंह यांनी बांबूपासून विविध उत्पादने बनविण्यात येतात. त्यामुळे या भागात बांबू लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन विविध उत्पादने बनविली पाहिजेत. चीन, व्हिएतनाम या देशात बांबूपासून  विविध उत्पादने तयार केली जातात. त्याच धर्तीवर भारतातही अशी उत्पादने बनविण्यासाठी आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन विशाल चोरडिया, जिल्हाधिकारी उदय चौधरी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, भारती मोरे, दीपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम तसेच अशोक दळवी, प्रकाश परब उपस्थित होते.

सिंह यांनी चितारआळी येथे लाकडी खेळण्यांच्या दुकानांना तसेच राजवाडय़ाला भेट दिली. राजवाडय़ात राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे नातू लखम सावंत यांनी सिंह यांचे स्वागत केले. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सिंह यांनी समाज मंदिरात भेट देऊन बुद्ध प्रतिमेला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार घातला. सिंह यांनी पालकमंत्री केसरकर यांच्या निवासस्थानीही भेट दिली.