|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काश्मिरी सैन्याधिकाऱयाची दहशतवाद्यांकडून हत्या

काश्मिरी सैन्याधिकाऱयाची दहशतवाद्यांकडून हत्या 

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील लेफ्टनंट उमर फयाज यांची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चुलत भावाच्या विवावाहासाठी फयाज यांनी यावर्षी पहिल्यांदाचा रजा घेतली होती. मात्र दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याने विवाह कार्यक्रमाच्या तयारीत असणाऱया उमर यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. स्थानिक नागरिकांसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी कुलगाम ग्रामस्थांनी केली आहे.

22 वर्षीय उमर यांनी दक्षिण काश्मीरमधील नवोदय विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले होते. डिसेंबर 2016मध्ये त्यांची पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) 129 बॅचमध्ये निवड झाली होती.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2 राजपूताना रायफल्समध्ये लेफ्टनंट म्हणून अखूनर विभागात त्यांची नियुक्ती झाली होती.  चुलत भावाच्या विवाहानिमित्त पहिल्यांदाचा रजा घेऊन ते कुलगाम या आपल्या गावी आले होते. मंगळवारी रात्री दोन बुरखाधारी दहशतवादी उमर याच्या घरात घुसले. अपहरणाची माहिती पोलिसांना दिल्यास याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही कुटुंबीयांना दिली. बुधवारी सकाळी उमर यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावरील हरमन चौकात आढळला. जवळून गोळय़ा झाडून त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात युद्धपातळीवर शोधमोहिम सुरू असून असल्याचे व्हिटर फोर्सचे ऑफिसर इन कमांड मेजर जनरल बीएस राजू यांनी सांगितले.

दहशतवाद्यांशी केला मुकाबला

 भारतीय सैन्यदलाच्या लढवय्या परंपरेप्रमाणे उमर यांनी अपहरणानंतर दहशतवाद्यांशी मोठय़ा धैर्याने मुकाबला केला. त्यांची दहशतवाद्यांशी झटापट  झाली. त्यांच्या छातीत, डोक्यात आणि पोटात खूप जवळून गोळय़ा घालण्यात आलयचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्याने स्थानिक नागरिकांसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दहशतवाद्यांचे नीच कृत्य: अरूण जेटली

 देशाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सैन्यदलात दाखल झालेले लेफ्टनंट उमर फयाज हे जम्मू-काश्मीरमधील तरुणाईचे आर्दश होते. भ्याड दहशतवाद्यांनी नीचपणाच कळस गाठत अपहरण करून त्यांची हत्या केली. उमर यांनी दिलेल्या बलिदानाने दहशतवादाचा खात्मा करण्याचा संकल्प अधिक दृढ होणार आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यवत केला.

   निर्घृण हत्येचा बदला घेणारच : लेफ्टनंट जनरल अभय कृष्णा

 दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले लेफ्टनंट उमर फयाज यांच्या कुटुंबीयांबरोबर संपूर्ण भारतीय सैन्यदल आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण कृत्याचा बदला घेतला जाईल, असे लेफ्टिनेंट जनरल अभय कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: