|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कास तलाव होणार गाळमुक्त

कास तलाव होणार गाळमुक्त 

प्रतिनिधी/ सातारा

ऐतिहासिक असा कास तलावाद्वारे सातारा शहराला पाणी पुरवठा केला जातो. या योजनेद्वारे अजूनही शहराच्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, कास तलावात गाळ मोठय़ा प्रमाणावर असल्याने उन्हाळय़ात पाण्याची टंचाई काही प्रमाणात भेडसावते. तलावातील गाळ काढण्याचे काम दोन दिवसांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. दोन डंपर आणि एका जेसीबीद्वारे हा गाळ काढला जात आहे.

सातारा शहराची सर्वात जुनी पाणी पुरवठा योजना असलेली कास तलावाची आजही महत्वाची अशीच समजली जात आहे. उघडय़ा पाटाने काही दिवसांपूर्वी पाणी आणले जात होते. आता ते बंदिस्त पाटाने येत आहे. काही ठिकाणी गळती लागते. परंतु पालिका प्रशासनाकडून लगेच ती गळती काढली जाते. सध्या कास तलावात 15 जूनपर्यंत पाणी पुरवठा पुरेल एवढा साडेआठ फुट पाणीसाठा आहे. नुकताच कास तलावाची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी केली होती. तत्पूर्वी पालिका प्रशासनाकडून कास तलावातील गाळ काढण्याबाबत लघुपाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार केला होता. पंधरा दिवसांपूर्वी केलेला हा पत्रव्यवहाराची दखल घेत लघुपाटबंधारे विभागाने गेल्या दोन दिवसांपासून एक जेसीबी आणि दोन डंपरद्वारे गाळ काढण्याचे काम सुरु केले आहे. दिवसाकाठी किमान चार डंपर गाळ काढला जात आहे, असे लघुपाटबंधारेचे यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता भोसले यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

तलावातील गाळ काढल्याने पाणी साठय़ात होणार वाढ

कास तलावातील गाळ काढण्यात आल्याने पाणी साठय़ात वाढ होणार आहे. यामुळे यावर्षी व पुढेही याचा फायदा होणार आहे. पाणीसाठय़ात वाढ झाल्याने शहरातील थोडे जास्त पाणी मिळेल, असे पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.

Related posts: