|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रदूषण नियंत्रणासाठी खाण कंपन्या सरसावल्या

प्रदूषण नियंत्रणासाठी खाण कंपन्या सरसावल्या 

प्रतिनिधी/ वाळपई

सोनशी भागातील खनिज खाणींना पर्यावरणाच्या दाखल्यासंबधी बसलेल्या जबरदस्त धक्क्यामुळे 13 रोजी होणाऱया प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीपूर्वी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी खाणकंपन्यांची घाई उडाली आहे. 13 रोजी होणाऱया बैठकीत पर्यावरणीय परवान्याच्या नुतनीकरणासंदर्भात निर्णय होणार आहे. ज्या कंपन्यानी प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य ती काळजी घेतलेली नाही त्यांचे नुतनीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कंपनीला 13 च्या बैठकीतच नुतनीकरण करून मिळायला हवे या उद्देशाने विविध कंपन्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे.

सद्या सोनशी भागातील 12 खनिज खाणी पूर्णपणे बंद आहेत. या सर्व खाणींची पर्यावयरण परवान्याची मुदत संपल्याने व्यवस्थापनांना खाणी बंद करणे भाग पडले आहे. आता तात्काळ या परवान्यांचे नुतनीकरण होणे आवश्यक आहे. या हंगामातील काही मोजकेच दिवस उरले असल्याने उरलेल्या दिवसात जमेल तेवढे खनिज काढून घेण्यास या कंपन्या उत्सूक आहेत. पावसाळय़ाच्या दिवसात या खाणींमधील काम बंदच असते. नुतनीकरणासंदर्भातली प्रदूषण नियंत्रण मंडळाची महत्त्वाची बैठक 13 रोजी होत आहे. या बैठकीत प्रदूषण नियंत्रणाबाबत काय उपाययोजना राबवणार याचा आराखडा सादर करण्याऱया कंपन्यांचाच परवाना नुतनीकरणासाठी विचार होणार आहे. ज्या कंपन्या हा आराखडा सादर करणार नाही त्यांचे परवाने रखडण्याची शक्यता आहे.

या भागातील कंपन्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी काही काळजी घेतली आहे की नाही याचीही पाहणी होणार असल्याने विविध कंपन्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यका कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. याअनुषंगाने खाणक्षेत्रातून मुख्य सार्वजनिक रस्त्याला जोडला जाणाऱया रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. धूळीने माखलेले रस्ते स्वच्छ करण्याचेकामही युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडात प्रथमच खाण कंपन्यांकडून रस्त्यांची साफसफाई सुरू आहे.

सोनशी भागातील रस्त्यावर खानिजमालाची वाहतूक होताना निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सेसा गोवा खाण कंपनीतर्फे रस्त्याच्या एका बाजूला जाळे मारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या परिसरात लोकवस्ती आहे. त्या ठिकाणी जाळी मारण्याचे काम करण्यात येणार आहे, असे यावेळी कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. येणाऱया चार ते पाच दिवसात सदर जाळी मारण्याचे काम पूर्णत्त्वास येणार आहे. खनिजकंपन्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या निष्काळजीपणाचा फटका आता याच कंपन्यांच्या अंगाशी आला आहे. गेल्या आठ दिवसापासून खनिज कंपनीचे सर्वच काम परवान्याच्या नुतनीकरणाअभावी बंद आहे. त्यामुळे कंपन्यांना मोठय़ा नुकसानीला समोरे जावे लागणार आहे. सुमारे 1200 ट्रकही यामुळे बंद आहेत. एकंदरित खनिजकंपन्यांशी निगडित सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.

Related posts: