|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईच्या पाण्याची पातळी घटल्याने गांजे प्रकल्पातील दोन पंप बंद

म्हादईच्या पाण्याची पातळी घटल्याने गांजे प्रकल्पातील दोन पंप बंद 

प्रतिनिधी/ वाळपई

म्हादई नदीच्या पाण्याची पातळी बऱयाच प्रमाणात कमी झाल्याने याचा परिणाम गांजे प्रकल्पातून खांडेपार नदीत सोडण्यात येणाऱया पाण्यावर झाला आहे. येणाऱया काळात याचा विपरित परिणाम ओपा पाणी प्रकल्पावर होणार आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांसमोर चिंता निर्माण झाली आहे. ओपा प्रकल्पावर याचा  परिणाम झाल्यास फोंडा, मडगाव व दक्षिण गोव्याच्या बऱयाच भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासंबंधीची माहिती अशी की, सरकारने ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेखाली म्हादई नदीवर अनेक ठिकाणी बंधारा योजना राबविली आहे. अशाच प्रकारचा बंधारा गांजे येथे बांधण्यात आला आहे. हा बंधारा म्हादई नदीच्या पात्रात बांधण्यात आलेला सर्वात मोठा बंधारा आहे. यात जवळपास 28 लाख घनमीटर पाण्याचा साठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर सरकारने खांडेपार नदीचे पात्र जिवंत ठेवण्यासाठी केला आहे. गांजे बंधाऱयावर 35 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी करूनही पाण्याचा साठा खांडेपार नदीत सोडण्याची योजना आहे. कोटय़ावधी खर्च करून पाण्याचा साठा खास जलवाहिनीद्वारे खांडेपार नदीत सोडल्यानंतर सदर पाणी ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी उपलब्ध होते. गांजे येथील सदर प्रकल्प जानेवारी महिन्यात कार्यान्वित करण्यात येतो. यंदाही जानेवारीत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. 300 एचपी क्षमतेचे तीन पंप यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र सध्या म्हादई नदीच्या पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात घटली आहे. यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक पाणी पुरवठा मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे गांजे प्रकल्पातील तीनपैकी दोन पंप बंद करावे लागले आहेत. याचा मोठा परिणाम खांडेपार नदीत पाणी वळविण्यावर झाला आहे. यामुळे सध्या अधिकारी वर्गाची अस्वस्थता वाढली आहे. पावसाळी मोसमास अजून काही दिवसांचा अवधी आहे. तोवर गांजे प्रकल्प बंद करावा लागणार याचा परिणाम ओपा प्रकल्पावर होणार आहे. सध्या गांजे प्रकल्पातील एकच पंप कार्यान्वित आहे. आणखीन दोन किंवा तीन दिवस हे पाणी मिळेल. त्यानंतर उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास प्रकल्पातील सर्व पंप बंद करावे लागतील.

जलसिंचन खात्यातर्फे म्हादई नदीच्या पात्रात वरच्या बाजूस बांधण्यात आलेल्या बंधाऱयाच्या फळय़ा काढून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे प्रकल्पाला काही प्रमाणात संजीवनी मिळत आहे. मात्र सदर प्रक्रिया जास्त दिवस चालणारी नाही. येणाऱया काळात खांडेपार नदीत पाणी वळविण्याची प्रक्रिया बंद झाल्यास याचा परिणाम ओपा प्रकल्पावर होणार आहे.

दक्षिण गोव्यातील अनेक भागात पाणी पुरवठा करणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. महत्वाचे म्हणजे खांडेपार नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱया पाण्याची चोरी काही औद्योगिक आस्थापने करीत असलयाची बाब उघडकीस आली आहे.

Related posts: