|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘सचिन… सचिन’ हे आव्हानात्मक

‘सचिन… सचिन’ हे आव्हानात्मक 

सचिन… सचिन हा एक नाद आहे. ‘सचिन’ चित्रपटासाठी जेव्हा मला विचारण्यात आले आणि आम्ही तयारी लागलो तेव्हा दडपण नक्कीच होते. सचिन या नावाभोवती असलेले वलय आणि त्याची क्रेझ लक्षात घेऊन त्याच प्रतीचे संगीत बनविण्याची जबाबदारी माझ्यावर होती. चित्रपटात असलेल्या गाण्यांपैकी ‘सचिन सचिन’ हे गाणे नक्कीच आव्हानात्मक होते, अशी कबुली ए. आर. रहमान यांनी दिली. मंगळवारी ‘सचिन : अ बिलीयन ड्रीम्स’ चित्रपटातील ‘सचिन सचिन’ हे गाणे लाँच करण्यात आले. त्यावेळी रहमानने आपले मनोगत व्यक्त केले.

सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानात खेळायचा तेव्हा त्याचे चाहते, क्रिकेटप्रेमी भारावून, भावूक, हळवे व्हायचे… हे सगळे भाव, ऊर्जा या गाण्यात आणणे कठीण होते. सचिनच्या मैदानावरील चौकार आणि षटकारांप्रमाणे हे गाणेही चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास ए. आर. रहमान यांनी व्यक्त केला.

सचिन आणि तुमच्यातला समान दुवा कोणता या प्रश्नाचे उत्तर देताना रहमान म्हणाले, या वयातही आम्ही तरुण दिसतो… पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपापल्या कामांमधून देशभक्तीसाठी असलेली निष्ठा सारखीच आहे.

क्रिकेटप्रेमींचा सगळ्यात आवडता सचिन… सचिन हा नाद गाण्यात वापरण्यात आला आहे. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना सचिन म्हणाला, हा नाद जेव्हा जेव्हा मी स्टेडियममध्ये ऐकायचो तेव्हा मला नेहमीच प्रोत्साहन मिळायचे. माझ्यावर चाहत्यांचे असलेले प्रेम यातून व्यक्त व्हायचे. त्यामुळे अटीतटीचा सामनाही मी सहज जिंकू शकायचो. त्याचे सगळे श्रेय या प्रेमाला आहे. ज्या पद्धतीन ए. आर. रहमान यांनी हा नाद गाण्यात वापरला आहे तो नक्कीच स्फूर्तिदायक आहे.

मैदानपलीकडे माणूस म्हणून सचिनचे आयुष्य या सिनेमात पाहायला मिळेल. त्याचा नम्रपणा आणि त्याचे आयुष्य याभोवतीच हा सिनेमा फिरतो. या चित्रपटासाठी सचिनने त्याच्या काही वैयक्तिक शॉर्टफिल्म्स वापरण्यासाठी दिल्या आहेत, असे चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स एरिक्सन म्हणाले.

या चित्रपटासाठी सचिनचा होकार मिळविण्यासाठी आम्हाला अनेक वर्षे वाट पाहावी लागली. त्याचे कर्तृत्व सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र त्यामागे असलेली मेहनत, त्याने केलेला त्याग हे चित्रपटात पाहायला मिळेल, असे निर्माता रवी भागचंदका यांनी सांगितले.