|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हेवाळेत सात हत्तींचा कळप दाखल

हेवाळेत सात हत्तींचा कळप दाखल 

दोडामार्ग : तिलारी धरण परिसरातून माघारी फिरलेल्या जंगली हत्तींच्या कळपाने बुधवारी रात्री हेवाळे-बाबरवाडी येथील महादेव ठाकुर यांच्या नाल्याजवळ असलेल्या बागायतीमध्ये सात हत्तींनी प्रवेश करून अवघ्या दोन ते तीन तासांत बागायतीतील सुपारीची झाडे, केळीची झाडे यांचा सफाया केला. बागेमध्ये आवाज येत असल्याने ठाकुर व इतर ग्रामस्थांनी बॅटऱया घेऊन पाहणी केली असता हत्तींचा कळप दृष्टीस पडला. त्यानंतर वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पहाटे पाच वाजेपर्यंत हा कळप बाबरवाडीतच होता, असे स्थानिक शेतकऱयांनी सांगितले.

चार दिवसांपूर्वीच घाटिवडे बांबर्डे वीजघर येथून सात हत्तींचा कळप हेवाळे बाबरवाडीमार्गे तिलारी धरणाच्या जलाशयाच्या दिशेने रवाना झाला होता. बुधवारी रात्री हा कळप तिलारी धरणामार्गेच दोरखंड बांधलेल्या ठिकाणाहून बाबरवाडीत दाखल होऊन गावातील डांबरी रस्ता क्रॉस करत रस्त्यापलीकडे नाल्याला लागून असलेल्या महादेव ठाकुर यांच्या बागायतीमध्ये दाखल झाला. हत्तींनी धुमाकूळ घालत सुपारीची 207 झाडे, तर केळींच्या शेकडो झाडांचे नुकसान केले.

हेवाळे-बाबरवाडी येथे बुधवारी रात्री हत्ती नुकसान केल्याचे समजताच कोनाळ वनपाल दत्ताराम देसाई व त्यांचे इतर सहकारी यांनी गुरुवारी सकाळी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी संतप्त शेतकऱयांनी वन कर्मचाऱयांना धारेवर धरले.