|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रतापसिंह हायस्कूल मोजतेय अखेरच्या घटका.!

प्रतापसिंह हायस्कूल मोजतेय अखेरच्या घटका.! 

प्रतिनिधी /सातारा :
माझ्या अंगाखांद्यावर पोरं शिकली, मोठी झाली. दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही इथे शिक्षणाचे धडे घेतले. अनेक शिक्षक बदलले. अनेक उन्हाळे, पावसाळे खाल्ले; पण मी आज त्याच दिमाखात उभी आहे, माझ्याकडे दुर्लक्ष होतेय, अशी आर्त हाकच प्रतापसिंह हायस्कूल मारु लागलंय. जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये सदस्यांकडून आवाजही उठवले जातात, परंतु कार्यवाही होत नाही. आजही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या हायस्कूल अखेरच्या घटका मोजत आहे, अशी अवस्था झाली आहे. शाळेचा वसतीगृहाचा परिसर म्हणजे दिवसा भकास, ओसाड आणि रात्री अवैध धंद्याचे आगार बनले आहे.
प्रतापसिंह हायस्कूल ही सातारा जिह्यातील पहिली शाळा. शहराचा आणि सातारा जिह्याचा शैक्षणिक प्रवास या शाळेतूनच सुरु झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सर न्यायाधीश गजेंद्र गडकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी या शाळेचे नाव आपल्या कर्तृत्वाने दुमदुमून टाकले. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर 1 ऑगस्ट 1853 नंतर पालिकेचे 1884 साली सिटी म्युनिसिपालिटीमध्ये रुपांतर झाले. त्यावेळी मुलांच्या मराठी शाळा 8, हिंदुस्थानी मिश्र शाळा 1, रात्रीची शाळा 1 व मुलींकरीता 1 अशा 11 शाळा होत्या. रात्रीची शाळा मजूर आणि कारागीर लोकांच्या मुलांकरीता होती. पालिकेकडे शिक्षण मंडळ येण्यापूर्वी 1866 साली साताऱयात 4 प्राथमिक शाळा होत्या. त्यामध्ये 538 विद्यार्थी होते. 1883 सालापर्यंत 10 सरकारी शाळा होत्या. त्यामध्ये 1 इंग्रजी शाळा, 7 मराठी मुलांच्या शाळा आणि एक मुलींची शाळा अशी स्थिती होती. इंग्रजी शाळा प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत सुरु झाली. या शाळेचे मुख्याध्यापक बाळशास्त्राr भागवत होते. ही शाळा पूर्वी रंगमहालात होती. 1871 मध्ये शाळेचे हायस्कुलमध्ये रुपांतर झाले. 1874 साली ही शाळा गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून सध्याच्या प्रतापसिंह हायस्कुलमध्ये (जुना राजवाडा) या ठिकाणी सुरु झाली. याच वास्तुमध्ये पालिकेच्या शाळा क्र. 1 आणि शाळा क्र. 13 या शाळाही पाचवी ते सातवी आणि पहिली ते चौथी असे शिक्षण देत होत्या. त्यानंतर साताऱयात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या नव्या नव्या शाळा उभ्या राहिल्या.