|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » म्हैसाळप्रकरणाची केंद्रानेही घेतली दखल

म्हैसाळप्रकरणाची केंद्रानेही घेतली दखल 

प्रतिनिधी/ सांगली

  संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱया आणि सांगली जिल्हयाची मान शरमेने खाली घालायला लावणाऱया म्हैसाळमधील डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे याच्या अवैध गर्भपात केंद्राची दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे. म्हैसाळ प्रकरणात शासकीय यंत्रणा विशेषतःआरोग्य विभागाचा हलगर्जीपणा, पीसीपीएनडीटी ऍक्टची होणारी पायमल्ली त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास आदी बाबींचे सत्य शोधनासाठी  केंद्रीय आरोग्य आणि कुटूंबकल्याण विभागाचे चार सदस्यीय पथक लवकरच सांगली जिल्ह्यात येत आहे. येत्या सोळा ते अठया मे दरम्यान हे पथक जिल्ह्यात येत असून त्यामूळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

  केंद्रीय आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालयाच्या संचालिका डॉ.सुषमा दुरेजा या समितीच्या अध्यक्षा आहेत. आरोग्य आणि कुटूंबकल्याणच्या डॉ.विना धवन, आरआयएचे संचालक डॉ.जिग्नेश ठक्कर आणि अवैध गर्भलिंग तपासणी तसेच गर्भपात केंद्राच्या विरोधात लढा उभारून बेटी बचाव क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱया समाजसेविका ऍड.वर्षा.देशपांडे अशी चार जणांची समिती दि. 16,17 आणि 18 मे रोजी जिल्हा दौऱयावर येत आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंबकल्याण मंत्रालयाने याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनला दिली आहे. म्हैसाळ प्रकरणाचे सत्यशोधन करण्यासाठी हे पथक म्हैसाळ गावी भेट देणार आहे. राज्य शासनाबरोबरच स्थानिक तपास यंत्रणेचीही भेट घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीसीपीएनडीटी ऍक्ट 1994 आणि एमटीपी कायदा 1971 ची जिल्हयात अंमलबजावणी कशी होते.त्याचा परिणाम काय झाला आहे. याबाबतही समिती सखोल माहिती घेणार आहे. जिल्हयातील अनेक सोनोग्राफी सेंटरनाही भेटी देऊन पहाणी करण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या दौऱयात म्हैसाळ प्रकरणातील सत्यस्थितीचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.

  मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे आपल्या भारती हॉस्पीटलमध्ये चालवत असलेल्या बेकायदा गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात केंद्राचा पर्दाफाश गर्भपातावेळी एका विवाहितेच्या झालेल्या मृत्यूनंतर झाला आहे.  याप्रकरणी डॉ.खिद्रापुरेवर  सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासह त्याच्या टोळीतील अनेकांना अटक करण्यात आली आहे.

मुळचा शिरोळ तालुक्यातील कनवाड येथील असलेल्या डॉ. खिद्रापुरे याने म्हैसाळमधील  सुतार गल्लीत ओपीडी सुरू केली होती. खिदापुरे आणि त्याची पत्नीही बीए.च.एम.एस असून  दहा वर्षापासून ते दोघे बेकायदा गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. गावात मध्वर्ती ठिकाणी शांतीसागर मार्गावर असणाऱया हॉस्पीटलवर टाकलेल्या छाप्यात एक एक्सरे मशीन,गर्भपातासाठी लागणारी उपकरणे, दवाखान्याच्या बील बुकात भुलतज्ञांना दिलेल्या पैशाच्या नोंदी, कुटूंब नियोजन करणे आणि गर्भाशय काढण्यासाठी संमतीपत्रांचे रजिस्टर, भुलीसाठी संमतीपत्रांचे रजिस्टर, याशिवाय रूग्णांच्या गांभिर्याची माहिती आणि त्यासाठी नातेवाईकांची संमतीपत्रे, तसेच सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर अशा दुरच्या गरोदर महिलांचे पत्ते असणारे रजिस्टर असे पुरावे सापडले आहेत.

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील सौ. स्वाती प्रवीण जमदाडे वय 26 या महिलेचा एक मार्च रोजी डॉ.खिद्रापुरे गर्भपात करत असतानाच मृत्यू झाला होता. पण हा मृत्यू अपघाती झाल्याचा बनाव करत पतीने  दहन करण्याचा प्रयत्न केला. 

 19 बॅगा सापडल्या,हाडाचे आणि मांसाचे तुकडे

मिरज रोडवरील हॉटेल विसावा शेजारील पडक्या जुन्या विहीरीत, त्याच्या जवळ असणाऱया जिजा पेट्रोल पंपासमोरील ओढय़ानजीकच्या खुल्या जागेत, म्हैसाळ पंपगृह टप्पा क्रमांक एक या परिसरातून जेसीबी आणि मजूरांच्या सहाय्याने खुदाई करून निळय़ा रंगाच्या 19 पिशव्या बाहेर काढण्यात आल्या. त्या पिशव्यातील काही अवशेष कुजलेले आहेत.तर काही मध्ये हाडे,मांसाचे आणि अवयांचे तुकडे आढळले आहेत.

पोलीसांनी सर्व तपास पुर्ण करत आरोपपत्रही सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.पण एकूणच्या या प्रकरणात अनेक शंका आहेत. पोलीस तपासापासून ते आरोग्य विभागापर्यंत अनेकावर संशयाची सुई असतानाही त्यांना वगळल्याची चर्चा आहे.जिल्हास्तरीय समितीने याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे.पण केंद्र सरकारची समिती जिल्हा दौऱयावर येत असल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.  आजपर्यंत म्हैसाळसारखी काही प्रकरणे उघडकीस आली.पण याची केंद्राने फारशी दखल घेतली नव्हती. केंद्र सरकारने अवैध गर्भपात प्रकरणाची प्रथमच दखल घेतली असल्याने आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

Related posts: