|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विविध दाखले तलाठी कार्यालयात

विविध दाखले तलाठी कार्यालयात 

खारेपाटण : बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग (बीपीआर) योजनेंतर्गत तहसील कार्यालयातून मिळणारे दाखले आता स्थानिक तलाठी कार्यालयात मिळणार आहेत. यासाठी प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला खारेपाटण तलाठी कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. राज्यातून पहिलाच अशा प्रकारचा प्रयोग खारेपाटणमध्ये राबवित असल्याचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी सांगितले.

 कोणत्याही दाखल्यासाठी नागरिकांना कणकवली कार्यालयात कमीत कमी दोन ते तीनवेळा हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. या सर्व त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी तहसील कार्यालयाने ही सुविधा स्थानिक तलाठी कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. आवश्यक दाखल्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज करायचा आहे. त्यानंतर तलाठय़ाकरवी अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. सोबतच चौकशी अहवाल जोडून संबंधित कागदपत्रे कणकवली तहसील कार्यालयात पाठवण्यात येतील. अर्ज व कागदपत्रांची छाननी करून तहसील कार्यालयामार्फत मंजुरी देण्यात येईल. यासाठी संबंधित अर्जदाराला कणकवली येथे जाण्याची गरज भासणार नाही. संबंधित दाखला नियोजित दिवसात स्थानिक तलाठी कार्यालयात मिळू शकणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्हीची बचत होणार आहे.

खारेपाटण येथे आठवडय़ात होणार प्रारंभ

खारेपाटण तलाठी कार्यालयात ही सुविधा आठवडाभरात उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाजी पेठ, काजिर्डे, बंदरगाव, नडगिवे, संभाजीनगर, चिंचवली या विभागांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी खारेपाटण ग्रामपंचायत येथे उपजिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत खास सभा घेण्यात आली. यावेळी सरपंच संदेश धुमाळे, सदस्य पप्पू रायबागकर, प्रदीप इस्वतकर, महेश कोळसुलकर आदी उपस्थित होते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एजंटांना बसणार चाप

दाखला मिळण्यासाठी सामान्य जनता वेळ वाचविण्याकरीता एजंटांची मदत घेत असे. याचा फायदा घेऊन एजंट 1000 ते 2000 रुपये एका दाखल्यासाठी घेत असत. या योजनेमुळे अशा एजंटांना चाप बसतो किंवा कसे, हे लवकरच समजेल.