|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बनावट सोनेप्रकरणी आणखी एकाला अटक

बनावट सोनेप्रकरणी आणखी एकाला अटक 

मालवण : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या चौके येथील शाखेची 24 कर्जदारांनी सुवर्णकाराच्या मदतीने 54 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कर्जदार चेतन विलास मुणगेकर (30, रा. एसटी स्टॅण्ड परिसर) याला शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी मागितलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने बचाव पक्षाकडून करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेऊन फेटाळली. न्यायालयाने संशयिताची रवानगी न्यायालयानी कोठडीत केली. संशयिताच्यावतीने ऍड. स्वरुप नारायण पई व ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.

याप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. सुवर्णकार वगळता इतर सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. चेतन विलास मुणगेकर (रा. एसटी स्टॅण्ड परिसर, मालवण) याने 81.540 ग्रॅम खोटे दागिने बँकेत ठेवल्याची तक्रार शाखाधिकाऱयांनी दिली होती. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम व कृष्णा परुळेकर हे करत आहेत. पोलिसांकडून न्यायालयाकडे संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

चौके बँकेचे शाखाधिकारी कमलाकर गोविंद धुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुवर्णकारासह 24 कर्जदारांवर भादंवि कलम 420, 465, 467, 471 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात बँकेकडून कर्जदारांनी घेतलेले कर्ज आणि बँकेत ठेवलेले खोटे दागिने याची यादीच पोलिसांना सादर केली होती. 24 कर्जदारांनी खोटे दागिने ठेवले असून सुमारे 53.94 लाख रुपयांहून अधिक कर्जाची उचल केल्याचे स्पष्ट झाले होते. यातील दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी दोन गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. याप्रकरणातील दोन्ही गुन्हय़ात समाविष्ठ असलेला सुवर्णकार कुणाल प्रभूलीकर हा अद्याप न्यायालयीन कोठडी आहे.

दरम्यान, याच प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या सौ. सुरेखा दत्ताराम परब यांची मालवण न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यांच्यावतीने ऍड. स्वप्नील उदय पराडकर व ऍड. हरेश्वर गरगटे यांनी काम पाहिले.

Related posts: