|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात पुन्हा वादळी पाऊस

सिंधुदुर्गात पुन्हा वादळी पाऊस 

मालवण : सोमवारी पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मालवण तालुक्यात दाणादाण उडविली. अत्यावश्यक सेवेतील दूरध्वनी, मोबाईल, वीज सेवा ठप्प झाली होती. महसूलचे कर्मचारी गंगाराम कोकरे यांच्या कारवर थेट माड कोसळला. सुदैवाने कोकरे कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या वाहनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्यावतीने लावण्यात आलेला भगवा झेंडा सोसाटय़ाच्या वाऱयामुळे कलंडला होता. पहाटे सुरू झालेला पाऊस दुपारी एक वाजल्यानंतर कमी झाला. जनजीवन विस्कळीत झाले होते. वाऱयामुळे समुद्राच्या पाण्यातही बदल झाल्याने स्कुबा डायव्हिंगवरही परिणाम जाणवत होता.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मोठय़ा प्रमाणात मालवणात दाखल असलेल्या पर्यटकांनी बूकिंग रद्द करून परतीचा मार्ग धरला. काही ठिकाणी पर्यटकांनी पहिल्या पावसाचा बंदरजेटी व किनाऱयावर मनसोक्त भिजून आनंद घेतला.

पर्यटकांचे जेटीवरूनच किल्ला दर्शन

सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला पर्यटन हंगाम 25 मेपर्यंत चालणार आहे. बंदर विभागाकडून साहसी पर्यटन आणि किल्ला होडी सेवेसाठी 25 तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे पर्यटन हंगाम काही दिवस अगोदरच संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरमध्ये 3423, ऑक्टोबरमध्ये 11,044, नोव्हेंबरमध्ये 45,071, डिसेंबरमध्ये 79,186, जानेवारीमध्ये 67,808, फेब्रुवारीमध्ये 28,404, मार्चमध्ये 28,244, एप्रिलमध्ये 32,126, मेमध्ये 20,000 पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली आहे. पावसामुळे अनेक पर्यटकांनी बंदर जेटीवरून किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतले. सुमारे 2 लाख 85 हजार पर्यटकांनी किल्ल्याचे दर्शन यावर्षी घेतले आहे. पर्यटन हंगाम लवकरच संपण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.

शहरात चिखलाचे साम्राज्य

    मालवण नगरपालिकेच्यावतीने सुरू असलेली गटारांची खोदाई अद्यापही सुरूच आहे. त्यात जोरदार कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच नळपाणी योजनेसाठी खोदाई केलेल्या रस्त्यावर अजूनही डांबरीकरण न झाल्याने खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालकांना वाहने चालवणे त्रासाचे ठरत आहे.

 किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील भगवा ध्वज कलंडला

  किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्यावतीने भगवा ध्वज उभारला होता. सोमवारी आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱयामुळे हा भगवा ध्वज तटावर कलंडला गेला. हा कलंडलेला भगवा ध्वज पूर्ववत करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

  दैव बलवत्तर म्हणून

 सोमवारी मालवणात कोसळलेल्या पावसाने व सोसाटय़ाच्या वाऱयामुळे हॉटेल सायबा येथील माड कोसळला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कोळंबहून मालवणच्या दिशेने जाणाऱया तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन गंगाराम कोकरे यांच्या वाहनावर हा माड कोसळला. कोकरे यांच्यासमेवत पत्नी दीपाली, मुलगे रोहित व दीप हे प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र वाहनाचा टप व दर्शनी भागाचे नुकसान झाले.

पावसामुळे घरांचे नुकसान

  सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे धुरीवाडा येथील राजेश दत्तात्रय मालवणकर यांच्या घरावर माड पडून घराचे वीस हजाराचे, तर रमेश पांडुरंग देऊलकर यांच्या घरावर माड पडून 4,700 रुपयांचे नुकसान झाले.  

चिंदर सडेवाडीत विजेचा थयथयाट

आचरा गडगडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने उत्तर रात्रीपासून आचरा परिसराला चांगलेच झोडपले. अवकाळी आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चिंदर सडेवाडी येथील दोन घरांवर वीज पडून घरांचे दरवाजे फोडून विद्युत मिटरसह लाईट फिटिंग जळून गेले. वीज उपकरणेही जळाली. श्रीमती विजयश्री हडकर यांच्या घराच्या भिंतीला भगदाड पाडत भिंतीचे उडालेले दगड बसून 15 ते 20 फुटावर ब्राह्मणदेव मंदिरात पूजा करणारे दिगंबर हडकर व एका घरातील रहिवासी वैभव हडकर हे किरकोळ जखमी झाले.

 चिंदर सडेवाडी भागात विजेने थैमान घालत येथील धोंडू श्रीधर वराडकर यांच्या घराच्या मागच्या सिमेंटचा दरवाजा फोडून घरात वीज विद्युत मिटरमध्ये जात घरातील संपूर्ण विद्युत फिटिंग जळून गेले. यात घरातील काम करणारी माणसे दुसऱया बाजूला असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याच वाडीतील श्रीमती विजयश्री विजय हडकर यांच्या विद्युत मीटरवर वीज पडून नुकसान झाले. लगतच असलेल्या ब्राह्मणदेव मंदिराच्या अंगणात पूजा करणारे दिगंबर हडकर यांना दगड बसून दुखापत झाली. ब्राह्मणदेव मंदिरातील लाईट फिटिंग पाण्याच्या पंपाचे पॅनेल जळून नुकसान झाले. याबाबत चिंदर पोलीस पाटील, दिनेश पाताडे, माजी सभापती धोंडू चिंदरकर, वायंगणी स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबू हडकर, ग्रा. पं. सदस्य देवू हडकर, राष्ट्रीय काँग्रेस उपतालुकाध्यक्ष भाऊ हडकर, चिंदर ग्रा. पं. कर्मचारी रणजित दत्तदास, आचरा पोलीस आदींनी तातडीने धाव घेत पाहणी केली.

पर्यटन नौका सुरक्षितस्थळी आणल्या

 सोमवारी सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे व सोसाटय़ाच्या वाऱयामुळे सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास दांडी येथील समुद्रकिनारी नांगरून ठेवण्यात आलेल्या दोन पर्यटन नौका खडकाळ भागातून वाहून जात होत्या. यावेळी यशवंत खवणेकर, प्रशांत तोडणकर, जगदीश खराडे व परेश पराडकर यांनी किनाऱयावरून छोटी होडी नेत या नौका सुरक्षित ठिकाणी आणल्या. जादा नांगर टाकून वाहणाऱया नौका नियंत्रणात आणण्यात आल्या.

देवगडात गडगडाटासह पाऊस

देवगड तालुक्यात सोमवारी सकाळी आठ वा. च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अर्धातास पाऊस पडला. अवेळी पडलेल्या या पावसामुळे हापूस आंबा फळावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटांमुळे दूरध्वनी सेवा खंडित करण्यात आली होती. देवगड शहरात सुमारे अर्धातास रिमझिम पडलेल्या या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. पहिल्यांदाच पाऊस पडल्याने मातीचा सुगंध सर्वत्र पसरला होता. आंबा हंगामातील शवटच्या टप्प्यातील आंबा मोठय़ा प्रमाणात असल्याने या पावसाचा फटका आंबा फळांना बसण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात वाऱयासह मुसळधार पाऊस पडल्याने आंबा फळांची मोठी गळ झाली आहे.

सावंतवाडीत मुसळधार पाऊस

सावंतवाडी ः सावंतवाडी आणि बांदा परिसरात सोमवारी ढगाच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. सोमवारी पहाटे पावसाचा हलकासा शिडकावा झाला. मात्र, सकाळी सव्वासातच्या सुमारास अर्धा तास पाऊस कोसळला. सकाळच्या सुमारास ढग दाटून आले होते. यादरम्यान विजेच्या लखलखाटामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. बांदा परिसरातही सकाळी पाऊस कोसळला. बांद्याच्या आठवडा बाजारावर पावसाचा परिणाम झाला. व्यापाऱयांची धांदल उडाली. टेलिफोन यंत्रणाही ठप्प झाली होती.

कुडाळातही पाऊस

कुडाळ कुडाळ तालुक्यातील काही भागात सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस पडला. मात्र, शहरात पहाटे व सकाळी तुरळक पाऊस पडला. ढगांचा गडगडाट व विजेच्या लखलखाटामुळे सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. माडय़ाचीवाडी-परुळे भागात जोरदार पाऊस कोसळला. गेल्या पाच दिवसापासून तालुक्यात कुठेनाकुठे पाऊस पडत आहे. सोमवारी पहाटेपासून बहुतांश गावात पावसाने दमदार हजेरी लावली.

Related posts: