|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » -‘दौलत’च्या देण्यावर साखर विक्रीचा तोडगा

-‘दौलत’च्या देण्यावर साखर विक्रीचा तोडगा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत (न्युट्रीयन्स) साखर कारखान्याकडील शेतकऱयांची थकित देणी देण्यासाठी न्युट्रीयन्स कंपनीने 20 कोटी रूपये 5 जून पर्यंत भरावेत. त्यानंतर साखर विक्री करून शेतकऱयांची देणी द्यावीत. कामगारांचा तीन महिन्याचा थकीत पगार जून, जुलै, ऑगष्ट अशा तीन टप्प्यात द्यावा. असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. दौलत साखर कारखान्याकडील थकित देण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजीत केली होती.

  बैठकीस पोलीस अधिक्षक संजय मोहिते, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व न्युट्रीयन्सचे सर्वेसर्वा विनायक उर्फ अप्पी पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, संग्राम कुपेकर, सुनिल शिंत्रे, राजेश पाटील यांच्यासह शेतकरी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

             एकरकमेवर शेतकरी ठाम

बैठकीच्या सुरवातीलाच एकरकमी थकित देणी मिळावीत अशी मागणी करीत शेतकरी, कामगार आक्रमक झाले. यामुळे बैठकीत गोंधळ उडाला. मात्र पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन केल्यांनंतर तणाव निवळला. न्युट्रीयन्स कंपनीच्यावतीने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विनायक पाटील यांनी कारखान्याच्यावतीने भूमिका मांडली. सर्व देणी एकरकमी देणे शक्य होणार नाही.  साखर विक्री झाल्याशिवाय पैसे देणे शक्य नसल्याचे सांगत 20 मे पर्यंत 10 कोटी रूपये भरण्याची तयारी दर्शवली. मात्र शेतकऱयांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. शेतकऱयांना कारखान्याकडून 22 कोटी रूपये येणे आहे. 10 कोटी रूपयात सर्व शेतकऱयांना पैसे मिळणार नाहीत. यामुळे हा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगितल्याने पेच निर्माण झाला.

कामगार प्रतिनिधी आक्रमक

ही चर्चा सुरू असतानाच कामगार प्रतिनिधींनी कामगारांचा थकित पगार कधी देणार असा प्रश्न उपस्थित करीत कामगारांना प्राधान्याने पैसे द्यावेत, अन्यथा साखर उचलू देणार नाही, असा इशारा दिल्याने गोंधळ वाढला. कामगार आणि शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ वाढला. अप्पी पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी बँकेची वसुली थांबवून शेतकरी, कामगाराची थकित देणी देण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी राजेश पाटील यांनी केली. मात्र जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी वसुली थांबवण्यास नकार दिला. यामुळे कामगार आणि शेतकऱयांच्यात गोंधळ सुरू झाल्याने चर्चा फिसकटली. अखेर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी हस्तक्षेप केला.

जिल्हाधिकाऱयांचा प्रस्तावास मान्यता

कारखान्याकडून सध्या सुमारे 30 कोटी रूपये देणी लागतात. यापैकी 22 कोटी रूपये शेतकऱयांच्या ऊस बिलाचे आहेत. 5 कोटी रूपये कामगारांना तर 3 कोटी रूपये ऊस वाहतूकदारांना द्यावे लागणार  आहेत. सध्या कारखान्याकडे 1 लाख 12 हजार क्विंटल साखर शिल्लक आहे. 30 कोटी रूपयांचे जिल्हा बँकेचे साखर तारण कर्ज आहे. यापोटी 72 हजार साखर पोती तारण आहेत. सर्व साखर विक्री केल्यास न्यूट्रीयन्स कंपनीस 40 कोटी रूपये मिळणार आहेत. 30 कोटी रूपये बँकेने कपात करून घेतल्यास कंपनीकडे 10 कोटी रूपये शिल्लक राहतात. शेतकरी, कामगार, वाहतुकीचे सर्व पैसे देण्यासाठी आणखी 20 कोटीची गरज आहे. यासाठी न्युट्रीयन्सने 20 कोटी रूपये एकरकमी द्यावेत असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व न्युट्रीयन्सचे सर्वेसर्वा अप्पी पाटील यांनी 5 जून पर्यंत 20 कोटी रूपये भरण्याची तयारी दर्शवली. यानंतर सर्व साखर विक्री करून शेतकरी, कामगार व वाहतूकदारांची थकित रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related posts: