|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केपेतील उन्हाळी शिबिराचा समारोप

केपेतील उन्हाळी शिबिराचा समारोप 

वार्ताहर/ केपे

मुलांना कलाक्षेत्रात उत्तेजन देणारे शिबिरासारखे उपक्रम संस्थेने यापुढेही हाती घ्यावेत. आपले त्यांना सदैव सहकार्य असेल, असे उद्गार ‘वुई फॉर केपे’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक योगेश कुंकळय़ेकर यांनी काढले. केपे येथील बीट ब्रेकर्स डान्स क्रू व वुई फॉर केपे या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिराच्या समारोप कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने कुंकळय़ेकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवदत्त नाचणेकर, प्रेमानंद शं. नाईक, प्रसाद फळदेसाई, सांजिल डिकॉस्ता, मानसी नाईक, देवदत्त पाटील, गौरेश गावकर, सुरेंद्र फळदेसाई, अविनाश फातर्पेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ कुंकळय़ेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला.

मुलांच्या अंगात सुप्तावस्थेत असलेल्या विविध कलागुणांना कमी – अधिक प्रमाणात बाहेर काढण्याचे अवघड काम वीस दिवस चाललेल्या शिबिराच्या माध्यमातून आयोजकांनी प्रामाणिकपणे केलेले आहे आणि ही बाब सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणातून सिद्ध झाली आहे. हा उपक्रम हाती घेणारे संस्थेचे अध्यक्ष शिवदत्त नाचणेकर, समन्वयक संदीप फळदेसाई व त्यांचे इतर सहकारी खरोखरच कौतुकास पात्र आहेत, असे कुंकळय़ेकर पुढे म्हणाले.

या शिबिरातून प्रशिक्षण घेऊन तयार झालेले विद्यार्थी हे गोव्याचे भावी कलाकार आहेत. या नवीन कलाकारांच्या निर्मितीमध्ये आमजनतेचे योगदानही फार महत्त्वाचे आहे. वुई फॉर केपे ही संस्था अशा उगवत्या कलाकारांना सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यास सदैव तत्पर असेल, असे संदीप फळदेसाई यांनी सांगितले. यावेळी शिबिरार्थींनी नृत्य, नाटय़, एकपात्री, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते आदींचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. शिवाय शिबिरात मुलांना प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षकांनाही गौरविण्यात आले. संदीप फळदेसाई यांनी प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन केले, तर सचिव मानसी नाईक यांनी आभार मानले.

Related posts: