|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लातूरच्या महापौरपदी सुरेश पवार, देविदास काळे उपमहापौर

लातूरच्या महापौरपदी सुरेश पवार, देविदास काळे उपमहापौर 

प्रतिनिधी/ लातूर

लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकविलेल्या भाजपाने महापौरपदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षात आलेल्या सुरेश पवार यांना बसवून काँग्रेसह भाजपाच्या निष्ठावंतानाही धक्का दिला. तर उपमहापौर देविदास काळे या भाजपा निष्ठावंतांला संधी दिली. या निवडणुकीत भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना 36 तर काँग्रेस उमेदवारांना स्वतःची 33 व राष्ट्रवादीचे एक असे प्रत्येकी 34 मते मिळाली. लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर व उपमहापौर निवड झाली. काँग्रेसचे महापौरपदाचे विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौरपदाचे उमेदवार युनूस मोमीन यांना दोन-दोन मताने पराभूत व्हावे लागले. अनुभवी सुरेश पवार यांच्या निवडीमुळे महापालिकेचा गाडा चालवायला अनुभवी चेहरा मिळाला आहे.

सभागृहात एकमेव सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिल्याने बलाबल 34 मते मिळाली. लातूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 70 पैकी सर्वाधिक 36 जागांवर भाजपाने विजय मिळविला. तर सत्तेत असेलल्या काँग्रेसला 33 व राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली. बहुमतात आलेल्या भाजपाचा महापौर होणार हे निकालाच्या दिवशीच निश्चित झाले होते.  मात्र कोणाची वर्णी लागणार याबाबत भाजपात अखेरपर्यत गुप्तता पाळण्यात आली.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाकडून महापौर व उपमहापौरपदासाठी प्रत्येकी चार अर्ज दाखल करण्यात आले होती. सोमवारी निवड प्रक्रिया सुरू होण्याअगोदर भाजपाचे सर्व नगरसेवक एकाचवेळी सभागृहात आले. सकाळी 10 वाजता महापौरपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यावेळी भाजपाकडून ऍड. शैलेश गोजमगुंडे, शोभा पाटील, देविदास काळे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे सुरेश पवार विरूद्ध काँगेसचे विक्रांस गोजमगुंडे यांच्यात निवडणूक झाली.

यावेळी सुरेश पवार यांना 36 तर विक्रांत गोजमगुंडे यांना 34 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भाजपाचे सुरेश पवार यांनी विजयी घोषित केले. त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपाकडून तिघांनी माघार घेतले. एकमेव देविदास काळे यांचा अर्ज भाजपाकडून राहिल्याने काँग्रेसचे युनूस मोमीन यांच्या लढत झाली. त्यात काळे यांना 36 व मोमीन यांना 34 मते मिळाली भाजपाचे पहिल्यांदाच मनपात सत्ता स्थापन केल्याने कार्यकर्त्यांनी मतपाच्या आवारात फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष केला.

काँग्रेसला धक्का, पण भाजपा निष्ठावंतातून मात्र तीव्र नाराजी

महापौरपदी काँग्रेसचा चेहरा देऊन भाजपाने काँग्रेसलाही जोरदार धक्का दिला आहे. कारण सुरेश पवार यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांनी हे चेहरे मनपात दिसणार नाहीत, असा इशारा दिला होता. यानंतरही पवार निवडून आलेच शिवाय भाजपाने संधी दिल्याने आता महापौरही झाले. दुसरीकडे भाजपाच्या या निर्णयाचा पक्षातील निष्ठावंतांनाही मोठा धक्का आहे. उपमहापौर देविदास काळे, नगरसवेक शैलेश गोजमगुंडे यांच्यासह मूळ पक्षात 30-40 वर्षे राबलेले कार्यकर्ते आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल करीत आहेत. मोठय़ा मुश्किलीने आलेली सत्ता भाजपाची होती की काँग्रेसमधून आलेल्यांसाठी असा प्रश्न निष्ठावंतांमधून विचारला जात आहे.

पहिल्याच सभेत गोंधळ !

मनपात भाजपाने सत्ता स्थापन केली असून पहिल्याच सभेत सभागृत नेता निवडीवरून काँग्रेस-भाजपाच्या सदस्यांत खडाजंगी झाली. महापौर सुरेश पवार यांच्या समोर काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. भाजपा गटनेतेपदी ऍड. शैलेश गोजमगुंडे यांची तर विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे ऍड. दिपक सुळ यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. काँग्रेस व भाजपाच्या वतीने स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली त्या काँग्रेसच्या वतीने चाँदपाशा इनामदार व पुणित पाटील तर भाजपाच्या वतीने भाजपाचे खजिनदार गुरूनाथ मग्गे, भाजपामधील नगरपालिकेच्या अभ्यास् म्हणून ओळखले जाणारे प्रकाश पाठक तर तिसरे अनंत गायकवाड यांना स्वीकृत सदस्य म्हणून घोषीत करण्यात आले.