|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वेळूस नदीवरील बंधाऱयाचे पाणी सुकल्याने सर्व उपसा योजना बंद

वेळूस नदीवरील बंधाऱयाचे पाणी सुकल्याने सर्व उपसा योजना बंद 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरीतील विविध नद्यांच्या पात्रात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बंधाऱयांपैकी अनेक बंधारे सुकल्यामुळे पाणी पुरवठय़ावर याचा परिणाम झाला आहे. खास करून वेळूस नदीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱयातील पाणी सुकल्याने सर्वच उपसा योजना बंद पडलेल्या आहेत. म्हादई व रगाडा नदीच्या प्रवाहावर कार्यान्वित असलेल्या उपसा योजना टप्प्याटप्प्याने सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक योजना बंद पडल्याने याचा प्रतिकूल परिणाम बागायतीच्या पाणी पुरवठय़ावर झाला आहे.

दहा वर्षांपूर्वी सरकारने म्हादई, रगाडा व वेळूस नदीच्या प्रवाहावर बंधारे बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना राबविली होती. याचा फायदा शेतकरी बांधवांना झाला होता. सत्तरीतील अनेक पडिक जमिनी ओलिताखाली येऊन कृषी विकासाला चालना मिळाली होती. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून अनेक विहिरी गेल्या कैक वर्षांपासून सुकत होत्या. त्यांना संजीवनी मिळाली होती. यामुळेच सत्तरीतील हजारो चौ. मी. क्षेत्रात विविध प्रकारची लागवड करण्यात आली आहे. एकूण तीन नद्यांवर 29 बंधाऱयाचे बांधकाम करण्यात आले आहे. पैकी वेळूस नदीच्या पात्रात बंधाऱयाचा समावेश आहे. या नदीवर उभारण्यात आलेल्या वेळूस, कोपार्डे, हेदोडे, आदी उपसा योजना पाण्याच्या अभावी बंद पडलेल्या आहेत. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आहे. या मागचे निश्चित कारण म्हणजे बंधाऱयातील पाण्याचा साठा होण्यासाठी यंत्रणा अपुरी ठरत असल्याने पाण्याचा साठा समाधानकारक होत नाही. पाण्याचा साठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱया लोखंडी फळय़ा पूर्णपणे गंजल्याने पाण्याचा साठा वाहून जाणे व बंधाऱयाच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात गाळ साचून तो खाली करण्यासाठी गांभीर्याने न घेण्याचा परिणाम पाण्यावर झाला आहे. पाण्याचा साठा होणाऱया जागेवर गाळ साचल्याने गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बंधाऱयांचे पात्र सुके पडत असल्याने ही समस्या निर्माण होताना दिसत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गाळ काढण्याची मागणी शेतकरी बांधव करत आहेत मात्र या संबंधी लक्ष देण्यात येत नाही. अशा तक्रारी सर्वत्र करण्यात येत आहेत. या बंधाऱयाची देखभाल करणाऱया जलसंपदा खात्याकडून गाळ उपसण्याचे प्रस्ताव सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत मात्र याचा कोणताही फायदा झालेला नाही. याचा त्रास शेतकऱयांना सहन करावा लागतो.

या संबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार म्हादई नदीच्या पात्रात समाधानकारक पाणी पुरवठा असल्याने या नदीवर कार्यान्वित असलेल्या सर्व उपसा योजना सुरु आहेत. यामुळे भागातील शेतकऱयांना पाण्यासाठी जास्त तक्रारी नाहीत मात्र पूर्वीप्रमाणे पाण्याचा साठा उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी दिसत आहेत. नाही म्हटल्यास या नदीच्या बंधाऱयातील गाळ उपसण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related posts: