|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘मैत्रेय’मुळे अपंगाचे कुटुंब अडचणीत

‘मैत्रेय’मुळे अपंगाचे कुटुंब अडचणीत 

मालवण : अपंग असल्याने मोलमजुरी करून मिळेल, ती रक्कम एजंटाकरवी ‘मैत्रेय’मध्ये गुंतवून भविष्यात आई आणि आपले सोनेरी स्वप्न पाहणाऱया शहरातील दांडी येथील फ्रान्सिस गाविद डिसोजा यांचे कुटुंबच अडचणीत आले आहे. गेली दोन वर्षे पैसे मिळण्याच्या आशेवर असलेला फ्रान्सिस आता आईच्या पालनपोषणासाठी धडपडत आहे. मात्र, मैत्रेय परिवारात एजंट आणि त्यांचे संचालक मात्र आजही उजळ माथ्याने फिरत आहेत.

फ्रान्सिस डिसोजा याने एका एजंटमार्फत मैत्रेयमध्ये दर महिना 350 रुपयांप्रमाणे सलग चार वर्षे पैसे गुंतविले. चार वर्षांनी 22 हजार रुपये मिळाल्याने ते फिक्स डिपॉझिट करून पुन्हा पैसे गुंतविणे सुरूच ठेवायचे, असे ठरविले. मात्र, पैसे मिळण्याची मुदत संपली, तरी पैसे मिळत नसल्याने त्याने शोधाशोध केली असता, मैत्रेय परिवारात गडबड झाल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसानंतर मालवणातील ऑफिसही बंद करण्यात आल्याने त्याच्या अडचणी अधिकच वाढल्या. अखेर एजंटही तोंड दाखविणे बंद केल्याने फ्रान्सिसला मानसिक धक्का बसला. आज फ्रान्सिस अपंग असून सायकलच्या सहाय्याने काजूगर सोलण्याच्या गिरणीतून एक डबा घेऊन घरी नेऊन आईच्या सहाय्याने काजूगर सोलण्याचे काम करतो. दिवसातून आजही दोनवेळा मैत्रेयच्या शाखेखाली उभा राहून शाखा उघडण्याची वाट पाहत आहे. फ्रान्सिसला आईच्या औषधोपचारासाठी येणारा खर्चही पेलवणारा नसल्याने त्याच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

सर्वसामान्य मच्छीमारांचेही पैसे बुडाले

मैत्रेय परिवारात मालवण बाजारपेठेतील अनेक सर्वसामान्य व्यापारी, मच्छीमार महिला आणि नागरिकांनी एजंटांवर विश्वास ठेवून पैसे गुंतविले होते. मात्र, ग्राहकांचे पैसे देण्याची वेळ आल्यावर मैत्रेय परिवारातील गडबड समोर दाखवित एजंटांनी पळ काढला. त्यामुळे सर्वसामान्य पैसे मिळण्याच्या आशेवर आहेत. काहींनी पोलिसांत तक्रार देण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र आपणच अडचणीत येऊ, या भितीने कोणीही तक्रार केलेली नाही. असे असताना फ्रान्सिसने पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सुमारे 50 लाख रुपये अडकलेत

मालवण तालुक्यातील सर्वसामान्यांचे सुमारे 50 लाख रुपये येथील मैत्रेयमध्ये अडकल्याची चर्चा शहरात आहे. मैत्रेय परिवरातील काहींनी गडबड केल्याने पैसे देण्यासाठी अडचणी आल्या आहेत. आता या प्रकरणात मैत्रेयतील बडय़ा व्यक्ती जेलची हवा खात असल्याने पैसे देण्याची जबाबदारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मैत्रेयमध्ये पैसे अडकल्याने काहींची लग्नेही राहून गेल्याचेही पुढे येत आहे. काहींनी मैत्रेयच्या जीवावर चांगलीच मजा केल्याचेही बोलले जाते. मैत्रेयकडून काही एनजीओंनी आपला चांगलाच फायदा उठवून अडचणीवेळी मैत्रेयशी संबंध तोडले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी यात गांभिर्याने लक्ष देऊन सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी फ्रान्सिसने केली आहे.

Related posts: