|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लग्न सोहळय़ात वधू-वराची सग्या-सोयऱयांना ‘वृक्ष’ भेट!

लग्न सोहळय़ात वधू-वराची सग्या-सोयऱयांना ‘वृक्ष’ भेट! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

‘पर्यावरण संवर्धन-वृक्ष संगोपन’ महत्व आज फक्त शासन प्रशासन स्तरावरच नाही तर ते आता सामाजिक स्तरावर तळागाळात पटू लागले आहे. रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावी संजय महाकाळ या तरूणाने आपल्या लग्न सोहळय़ात वृक्ष संवर्धनाला जोड देण्याचा अनोखा पायंडा रचला आहे. लग्नात भेटवस्तूरूपी आहेराचा बडेजाव न स्वीकारता भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सग्या-सोयऱयांना चक्क फळरोपांचे ‘वृक्षदान’ करून ‘वृक्ष लावा दारोदारी, समृध्दी येईल घरोघरी’ हा संदेश उपस्थितांना दिला.

पर्यावरणावर होणाऱया दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्यावर उपयायोजना करणे काळाची गरज बनली आहे. शहरांचा विस्तार वाढत आहे, तसे वृक्षांची तोडही वाढत चालली आहे. यामुळे शहरांच्या निसर्ग सैंदर्यीकरण आणि पर्यावरण तसेच हवामानावर याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने किमान दरवर्षी एक तरी वृक्ष लावावा व त्याचे संवर्धन करावे. त्याचे संवर्धन केल्यास भावी काळात मनुष्याला याचा फायदा नक्कीच होणार, यात शंका नाही. अनेक भागात रस्ता रुंदीकरण, मोठे प्रकल्प, धरणे, बांधकाम, उद्योगधंदे उभारताना वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्याचा पर्यावरण तसेच वन्यजीवानांही फटका सहन करावा लागत आहे.

अनेक संघ-संस्थानी वृक्ष संवर्धनासाठी रोपटी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज वृक्ष लागवडीची आवश्यकता बनलेली ही चळवळ व्यापक बनू पाहत आहे. ती केवळ शासन उपक्रम न राहता आता सामाजिक, कौटुबिंक स्तरापर्यत पोहोचली आहे. त्याचे ताजे उदाहरण आगरनरळ गावात प्रकर्षाने दिसून आले. आगरनरळ गावाचे प्रभारी सरपंच जयवंत महाकाळ यांचे धाकटे बंधू संजय महाकाळ यांचा लग्नसोहळा दापोली तालुक्यातील पंदेरी येथील सुधाकर जाधव यांची सुकन्या ममता हिच्याबरोबर थाटामाटात आगरनरळ येथे पार पडला.

लग्न सोहळा म्हटला की मोठय़ा भेटवस्तू आहेर देणे हे आलेच. पण त्या आहेराला संजय महाकाळ या तरूणाने तिलांजली दिली. सग्या-सोयऱयांना निमंत्रित केले पण त्यांच्याकडून कोणतीही भेटवस्तू स्वीकारली नाही तर केवळ त्यांच्याकडून आर्शीवादरुपी शुभेच्छा स्वीकारल्या. पण त्या शुभेच्छा स्वीकारताना संजय व ममता या नवदाम्पत्यांने सग्या-सोयऱयांना रिकाम्या हाती परत पाठवले नाही. ‘आता चालवा एकच चळवळ, लावा वृक्ष करा हिरवळ’ हा संदेश देत चक्क फळरोपे भेटवस्तू म्हणून प्रदान केल्या. लिंब, काजू, साग, कोकम यांची रोपे भेट देत शुभेच्छा स्वीकारल्या. या लग्न सोहळय़ात सुमारे 500 फळरोपांचे संजय-ममता या नवदाम्पत्याने उपस्थितांना वाटप केले व त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला.

आगरनरळ हा परिसर अलिकडच्या काळात औद्योगिकीकरणाच्या टापूत आला आहे. त्यामुळे या परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे झपाटय़ाने होत असलेले नागरिकरणाचा परिणाम तेथील पर्यावरणावर होऊ घातला आहे. हे थांबवण्यासाठी त्या परिसरात असलेल्या पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आता साऱयांनाच उचलावी लागणार आहे. त्यातूनच जितेंद्र महाकाळ या तरूणाला आपल्या लग्न समारंभाच्या निमित्ताने ही अनोखी संकल्पना सूचली व त्याने ती प्रत्यक्षात उतरवली. लग्नसमांरभावेळी उपस्थितांना वृक्षरोपांचे वाटप करण्यासाठी जि. प. माजी शिक्षण सभापती शरद बोरकर, श्रीधर महाकाळ, प्रभाकर महाकाळ, विठ्ठल महाकाळ, अर्चना महाकाळ, शांताराम भालेकर, बाळकृष्ण लवंदे, दीपक निवाते, केशव निवाते हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. संजय याने आखलेला हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र महाकाळ, सुदर्शन महाकाळ, सुदेश महाकाळ, मारूती महाकाळ, प्रशांत महाकाळ, विशाल दिवेकर, मोहित खडपेकर, सुभाष महाकाळ, संपदा महाकाळ, वर्षा खडपेकर, संतोष महाकाळ, सचिन महाकाळ, सुबोध महाकाळ यांनी मोलाची साथ दिली.