|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एक होते चंद्रास्वामी

एक होते चंद्रास्वामी 

तांत्रिक चंद्रास्वामी यांच्याविषयी आजच्या पिढीला फारसे कुतूहल असणार नाही. भारतीय राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वव्यापी प्रभाव दिसून येतो आहे. तितके प्रभावी व्यक्तिमत्त्व पी.व्ही नरसिंहराव यांचे नव्हते. मात्र ते मुरब्बी राजकारणी होते. देशातल्या दोन महत्त्वाच्या घटना त्यांच्या काळात झाल्या. एक म्हणजे आर्थिक धोरणातील बदल आणि दुसरे म्हणजे वादग्रस्त बाबरी मशीद पाडली जाणे.  पहिल्या घटनेने देशाचा आर्थिक चेहरा-मोहरा बदलला. दुसऱया घटनेने राजकारणाला वेगळ्या वळणावर नेले.  चंद्रास्वामी यांचे दिल्लीच्या राजकारणातले प्रस्थ वाढले तेसुद्धा राव यांच्या काळातच. असे म्हणतात की कोणतीही पूर्व परवानगी न घेता ते पंतप्रधानाना भेटू शकत. चंद्रस्वामी म्हणजे कोणी आध्यात्मिक सत्पुरूष नव्हते. मात्र त्यांच्या करामतीच्या अनेक कथा त्या काळात माध्यमातून चर्चेत होत्या. राजस्थानातल्या बहरोर गावच्या जैन कुटुंबात जन्मलेला नेमिचंद पुढे जावून चंद्रास्वामी होईल आणि पंतप्रधानांचा निकटचा सल्लागार बनेल, सौदे अरेबियाचा शस्त्रास्त्र दलाल अदनान खगोशी, डॉन दाऊद इब्राहिम, हॉलिवूडची अभिनेत्री ऐलिझाबेथ टेलर, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर, बहारिनचा शेख, ब्रुनेईचा सुलतान यांच्याशी तो सल्लामसलत करेल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष त्याला खास विमान पाठवून बोलावून घेतील यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवला नसता. त्यांचा नंतरचा तिहारच्या तुरुंगापर्यंतचा प्रवासही तेवढाच थक्क करणारा होता. राजीव गांधी प्रकरणातील संशयित आरोपी, शस्त्रांची दलाली, हवाला
रॅकेट यामुळे ते नेहमीच संशयाच्या भोवऱयात राहिले. मात्र अलीकडच्या काळात हे व्यक्तिमत्त्व जवळपास विस्मरणात गेले होते. चंद्रास्वामी ही एक वृत्ती असते. कोणत्याही समाजात ती वेगवेगळ्या रुपांमध्ये अस्तित्वात असते. देशकाल परिस्थितीचा त्याला अपवाद नसतो. माणसातल्या उणिवांचा अचूक फायदा उठविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. लोकशाही व्यवस्थेतले कोणतेही सरकार धर्मनिरपेक्ष असावे अशी अपेक्षा असते. मात्र सरकार ज्याच्या हाती असते त्या नेत्याचा, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा प्रभाव कळत नकळतपणे सरकारवर होत असतोच हे वास्तव आहे.  भारतातच नव्हे, तर जगभरात धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातले संबंध कधी संघर्षाचे, कधी मैत्रीपूर्ण, परस्परांचे हितसंबंध जोपासणारे राहिले आहेत. लोकशाही व्यवस्थेत धर्मसत्तेला गौणस्थान असते. पण वास्तवात समाजमनावर  धर्मसत्तेचा प्रभाव असतोच. वेगवेगळ्या माध्यमातून राजसत्तेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न धर्मसत्ता करीत असते. राजसत्ताही धर्मसत्तेचा वापर आपल्या हेतुपूर्तीसाठी करीत असते.  विविध धर्म आणि जातीमध्ये विभागलेल्या भारतासारख्या देशात तर धर्मसत्तेच्या सावलीत राहून स्वतःचा प्रभाव  निर्माण करणाऱया तथाकथित साधू,  बुवा यांची संख्या  लक्षणीय  असणे साहजिकच. चंद्रास्वामी हा असाच एक बदनाम चेहरा. त्यांच्याकडे धार्मिक, आध्यात्मिक असे काय होते हा खरोखरीच शोधाचा विषय ठरावा. खरे तर अध्यात्म साधनेचा हेतू पूर्णपणे वेगळा असतो. लौकिक जगातल्या सर्वसामान्यांचे जगणे आणि सिद्धपुरुषाचे जगणे यामध्ये फरक असतो. चंद्रास्वामीची गणना त्यामध्ये कधीच होऊ शकणार नाही. साधूपणाचा बुरखा पांघरलेला दलाल असेच त्यांच्याबाबतीत म्हणावे लागेल. असे लोक दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पंतप्रधानांच्या भोवतीच असतात असे नाही.  प्रत्येक राज्याच्या मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांच्या दालनाभोवती वेगवेगळ्या रूपात सराईतपणाने अनेक चंद्रास्वामी सत्तापदाला वेटोळा घालून बसलेले असतात. इतकेच कशाला आमदार, खासदार, मंत्री, तसेच अगदी तर गावातले सरपंच, साखर कारखान्यांचे चेअरमन यांचे सल्लागार म्हणून वावणारे छोटे मोठे चंद्रास्वामी नेत्यांची निर्णयप्रक्रिया प्रभावित करीत असतात. अशा लोकांचे प्रस्थ वाढण्यामागे काय कारणे असावीत याचा शोध घेतला तर काही उत्तरे नक्कीच मिळू शकतात. मानवी जीवन एका प्रकारच्या अनिश्चिततेने भरलेले असते. बहुतेकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची सत्ता हवी असते. मात्र ती असणारे वा नसणारे दोन्ही प्रकारचे लोक अशांत, असमाधानी असतात. आपले भविष्य काय हे त्यांना अज्ञात असते. त्यांचा वर्तमानकाल असुरक्षिततेने ग्रासलेला असतो.  चंद्रास्वामींच्यासारखे लोक मग त्यांच्या जगण्याचे टेकू होतात. चंद्रास्वामी हे राजकारणातच असतात असे नाही.  चित्रपटाच्या क्षेत्रात  आपण डोकावून पाहिले तरी तेथे असंख्य चंद्रास्वामींचे अवतार सापडतील.  निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या भजनी लागल्याचे दिसून येईल. हे चंद्रास्वामी त्याचे गुरु म्हणून, सल्लागार म्हणून काम करत असतात.  त्यांच्यावर  अमाप श्रद्धा असते. त्यांच्या सल्ल्याशिवाय ते चित्रपटाचा मुहूर्त करीत नाहीत. त्यांच्या बोटामधील  अंगठय़ामधील खडे  चंद्रास्वामींच्या सांगण्यावरूनच निवडले गेलेले असतात. जेवढा माणूस उच्चपदस्थ, श्रीमंत, भ्रष्ट तेवढा आतून भयभीत. त्यापासून सुटण्यासाठी मग चंद्रास्वामी उपयोगी येतील अशी आशा त्यांना वाटते. माणसाला आयुष्यात एखादा गुरू, मार्गदर्शक असणे यात गैर काही नाही. कुणी कुणावर कशाप्रकारे श्रद्धा ठेवावी हा व्यक्तीगत प्रश्न असतो. मात्र विवेक-अविवेकाचे भान सोडून भजनी लावणारा गुरू शिष्याचे जीवन बरबाद करू शकतो. जगण्यातला तात्पुरता आनंद कोणता आणि शाश्वत आनंद कोणता हे  ज्यांना कळते त्यांना चंद्रास्वामीची गरज भासत नाही. नरसिंहराव यांच्या काळात जवळपास समान्तर सत्तेचे केंद्र बनलेले चंद्रास्वामी हे नाव चांगल्या कारणासाठी कुणाला आठवणार नाही. मात्र एक चंद्रास्वामी काळाच्यापडद्याआड गेले असले तरी राजकारणातली, समाजातली ही वृत्ती कमी झालेली नाही. उलट गेल्या दीड-दोन दशकांच्या काळात ती वेगवेगळ्या माध्यमातून फोफावत गेल्याचे दिसते. नव्हे त्यांना मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळू लागली आहे. एखादा चंद्रास्वामी, आसारामबापू तुरुंगात जातो. बाकीचे सहिसलामत राहून व्यवस्था पोखरत राहतात. त्यांचे आपण काय करणार या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे.