|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सामाजिक न्याय विभागाला गती दिली

सामाजिक न्याय विभागाला गती दिली 

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / कोल्हापूर

भाजप आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, आदी महामंडळांच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. आरक्षणापेक्षा मागास कुटुंबातील युवकांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देत यंदा 75 विद्यार्थ्यांना परदेशात पाठवून उच्च शिक्षण घेण्याच संधी उलब्ध करून दिली. अनेक योजना मार्गी लावत सरकारने सामाजिक न्याय विभागाला गती दिल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ‘शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक’ व  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार’ वितरण प्रसंगी ते बोलत होते.  संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभास महसूलमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, समाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, राज्याचे समाजकल्याण आयुक्त पियुष सिंह, आमदार सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर, महापौर हसीना फरास यांच्या उपस्थितीत 125 समाजसेवक व 6 संस्थांना समारंभपूर्वक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बाल शाहीर गंधर्व पृथ्वीराज यांच्या महाराष्ट्र गिताने कार्यक्रमाची सुरवात झाली.

राजर्षी शाहू कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न

राज्याच्या एकूण बजेटच्या 20 टक्के बजेट समाजिक न्याय विभागाचे आहे. समाजिक न्याय विभगाच्या विविध योजनांचा आढावा घेत मंत्री बडोले म्हणाले, महाराष्ट्राला संतांची भूमी संबोधले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महात्मा जोतिबा फुले, रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला. त्यांच्याच विचाराने समाजिक न्याय विभागाचे काम सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया संस्था आणि लोक सेवकांनी जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले. महात्मा जोतिबा फुलेंचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालू ठेवले. आरक्षणाची मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी रोवली. तोच धागा पकडून घटनेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे आरक्षण देवून शाहू महाराजांचे स्वप्न डॉ. आंबेडकर यांनी सत्यात उतरवल्याचे सांगून आरक्षणाच्या माध्यमातून बहुजनांना एकत्र घेवून पुढे जाण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

अधिकाऱयांनी मिशन म्हणून काम करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकीय परिवर्तन तर सतत होत असते. समाजिक संस्थांनी मात्र समाज उत्थानाच्या माध्यमातून परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज आहे. घटनेतील तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभागातर्फे अनेक योजना दिल्या जातात. या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा यासाठी शासकीय अधिकाऱयांनी मिशन म्हणून भूमिका बजावण्याची गरज आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून करोडो रूपये समाजिक न्याय विभागाकडून खर्च झाले आहेत. मात्र दलित समाजातील लोकांच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आजही कित्येक दलित झोपडपट्टीत राहत आहेत. त्यामुळे हा निधी गेला कुठे असा प्रश्न पडतो. ज्यांनी लाभ घेतला आहे, त्यांनी स्वत:हून बाजूला होऊन उपेक्षित असलेल्या घटकांना न्याय देण्याची भूमिका बजावण्याची गरज आहे. तरच समाजिक विषमता दूर होईल यासाठी अधिकाऱयांनी मिशन म्हणून काम करावे.

50 वसतिगृहे बांधली : सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना शिक्षण मिळावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुलींसाठी राज्यात 50 वसतिगृहे बांधली. त्यापैकी 2 वसतिगृहे राजर्षी शाहूंच्या नगरीत झाली आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करून या योजना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत कशा पोहचतील यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या भूमीचा विकास सरकार करीत आहे. लंडनमधील घराचे स्मारकात रूपांतर केले. मुंबई येथील इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली. सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानाचे कार्य करीत आहे. 

प्राचार्य साळुंखे, देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील बापूजी साळुंखे विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, चिंचणे ता. चंदगड येथील पांडुरंग देशमुख यांनाही ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार’ प्रदान केल्यानंतर सभागृहात टाळय़ांचा कडकडाट झाला. तर पुरस्कार वितरणानंतर प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्यावर कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Related posts: