|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत वराडचा सुपुत्र

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत वराडचा सुपुत्र 

मालवण : मूळ मालवणी असलेले लिओ अशोक वराडकर सध्या आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. जूनमध्ये होणाऱया या निवडणुकीतील ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. लिओ सध्या आयर्लंडचे सामाजिक संरक्षणमंत्री आहेत. फाईन गेल या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पॉलिटिकल पार्टीतर्फे ते राजकारणात आले. विशेष म्हणजे लिओ हे मंत्रिमंडळातील पहिले ‘गे’ सदस्य आहेत. लिओ मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र आहेत.

  38 वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलिंग त्यांच्या कर्तृत्वाचे मुख्य ठिकाण. सुरुवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवित तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपद तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रिपदावर त्यांनी प्रभावी काम केले. त्यामुळेच थेट पंतप्रधानपदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सिमोन कोवनी यांच्याशी आहे. लिओ यांना मिळणारे समर्थन पाहता ते पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटू नये, अशी राजकीय स्थिती आहे.

  लिओ यांचे कुटुंब मूळचे वराड (ता. मालवण) या छोटय़ा गावातील. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर आहेत. ते मुंबईतून 1960 मध्ये आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. त्यांनी तेथेच नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱया मूळ आयरिश असलेल्या मिरिअम यांच्याशी विवाह केला. लिओ यांना दोन मोठय़ा बहिणी आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबाची आपल्या गावाशी असलेली नाळ अजूनही कायम आहे. लिओंचे आई- वडील दोन वर्षांपूर्वी धार्मिक कार्यक्रमासाठी वराड येथील आपल्या गावी आले होते.

  वराडकर कुटुंबियांचे गावात घर व बागायती-शेती आहे. त्यांची शेती व घर हे त्यांचे चुलत बंधू वसंत वराडकर सांभाळतात. लिओ यांचे आई-वडील वर्षातून दोनदा गावी येतात. लिओ आयर्लंडचे पंतप्रधान झाले, तर त्यांना गावी आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे काका म्हणाले.

समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते

 लिओ समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते मानले जातात. आपल्या 36 व्या वाढदिवशी 2015 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली होती. समलिंगी विवाह, गर्भपात कायद्यात काही प्रमाणात शिथीलता अशा धोरणांचा त्यांनी पुरस्कार केला. यासाठी त्यांनी मोहीमही राबविली. आयर्लंड हा सामाजिकदृष्टय़ा रुढीवादी देश मानला जातो. अशा ठिकाणी असे विचार घेऊन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांनी मारलेली मुसंडी आश्चर्यकारक मानली जात आहे.