|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कुमारस्वामी यांच्यावर होणारे आरोप थांबवा

कुमारस्वामी यांच्यावर होणारे आरोप थांबवा 

प्रतिनिधी / बेळगाव

दलितांच्या घरी भोजन करून आपण जातीभेद करत नसल्याचा आव भाजपचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आणला आहे. मात्र जे भोजन त्यांनी केले ते एका हॉटेलमधूनच तयार करून घेण्यात आले होते. यावरुरून भाजपच्या नेतेमंडळींचा ढोंगीपणा उघड झाला असून केवळ मतांसाठी त्यांनी हा नवा अजेंडा राबविला असल्याचा आरोप निजदच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अशा या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निजदच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

दलितांचा विकास करण्याऐवजी त्यांना केवळ आश्वासने देऊन भाजपने आजपर्यंत दलितांची दिशाभूल केली आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार असताना दलितांसाठी कोणत्याही योजना राबविल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे भाजप काळात दलितांवर अन्याय झाला होता. असे असताना आता निवडणुका तोंडावर आल्यामुळे दलितांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दलितांच्या विकासासाठी वेगवेगळय़ा योजना राबविल्या होत्या. मात्र अशा या प्रामाणिक नेत्यावरच आयकरच्या धाडी टाकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कुमारस्वामी यांची 20 हजार कोटी बेहिशोबी मालमत्ता असल्याचा खोटा आरोप भाजपचे नेते मंडळी करत आहेत. सध्या राज्यात प्रादेशिक पक्ष असलेल्या निजदला पाठिंबा वाढू लागला आहे. यामुळे भाजप व इतर पक्षांची कोंडी होत आहे. त्यामुळेच कुमारस्वामी यांना बदनाम करण्याचा घाट सुरू असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

अशा प्रकारे जर कुमारस्वामी यांच्यावर आरोप होत असतील तर निजद स्वस्थ बसणार नाही. आपण दलितांचे कैवारी म्हणत असताना जातीभेद दाखविण्याचा प्रयत्न बी. एस. येडियुराप्पा यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. कुमारस्वामी यांच्यावर होणारे आरोप थांबविण्यात आले नाहीत तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी निजदचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, पी. एफ. पाटील, चन्नाप्पा वगण्णावर, ऍड. जी. एल. हल्लूर, सुभाष पुजेरी, फैजुल्ला माडीवाले, टी. एन. पठाण, रेणुका गौडरु, गिरीश गोकाक, एस. एस. नाईक, एम. जावेद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: