|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मेट्रोसाठी बडय़ा कंपन्यांमध्ये चुरस

मेट्रोसाठी बडय़ा कंपन्यांमध्ये चुरस 

मुंबईतील मेट्रो 2 बी आणि मेट्रो 4 च्या स्थापत्य तसेच विद्युतीकरणाच्या कामासाठी बडय़ा कंपन्यांमध्ये चुरस आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पासाठी जारी केलेल्या निविदांना नामांकित कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून त्यात रिलायन्स, एल ऍण्ड टी, टाटा प्रोजेक्ट या कंपन्यांचा समावेश आहे.

एमएमआरडीएने डी. एन. नगर-वांद्रे-मानखुर्द या मेट्रो 2 बी आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो 4 च्या स्थापत्य तसेच विद्युतीकरणाच्या कामासाठी निविदा काढल्या आहेत. या निविदेत कारडेपोच्या कामाचाही समावेश आहे. मेट्रो 2 बीच्या कामाचे चार तर मेट्रो चारचे पाच भाग करण्यात आले आहेत. मेट्रो 2 बी साठी 10 हजार 986 कोटी रुपये तर मेट्रो चारसाठी 14 हजार 549 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दोन्ही मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी एल ऍण्ड टी, ऍफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, जीएचईसी-आरसीसी, एनसीसी, जे. कुमार, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, आयटीडी सिमेन्शन, चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनी आणि टाटा प्रोजेक्टस्च्या संयुक्त कंपनीने रस दाखवला आहे.

मेट्रो 2 बीच्या चारपैकी एका टप्प्यात तर मेट्रो चारच्या पाच टप्प्यात एल ऍण्ड टी कंपनी काम करण्यास उत्सुक आहे. ऍफकॉन कंपनीला मेट्रो 2 बीच्या एका टप्प्यात तर मेट्रो चारच्या 2 टप्प्यात रस आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दोन्ही प्रकल्पातील प्रत्येकी तीन टप्प्यात काम करण्याची तयारी दाखवली आहे. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मेट्रो 2 बीच्या दोन टप्प्यासाठी आणि मेट्रो चारच्या एका टप्प्यासाठी उत्सुक आहे. सिमेन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मेट्रो 2 बी च्या दोन टप्प्यासाठी इच्छुक आहे. आता या कंपन्यांशी वाटाघाटी करून डिसेंबर 2017 अखेरीस मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

मेट्रो 2 बी

डी. एन. नगर-वांद्रे-मानखुर्द

स्थानकांची संख्या 23

अंतर 23.6 किलोमीटर

खर्च 10 हजार 986 कोटी रुपये

 

मेट्रो 4

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली

स्थानकांची संख्या 32

अंतर 32.3 किलोमीटर

खर्च 14 हजार 549 कोटी रुपये