|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाहने अडवून लुटणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

वाहने अडवून लुटणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद 

प्रतिनिधी / सातारा

सोलापुर ग्रामीण वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग कापसे यांचीच कार अडवून मारहाण करुन मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे 24 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ 12 तासाच्या आत जेरबंद केली. त्यांच्याकडून दरोडय़ातील मुद्देमालही हस्तगत केला. या घटनेत गेंदवले बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या मुलाचाही समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईबाबत कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले, दि. 25 रोजी सातारा ते पंढरपूर या रस्त्यावरुन सोलापूर ग्रामीण वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग कापसे हे निघाले होते. सोलापुरवरुन ते साताऱयाकडे येत होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारसमोर फिल्मी स्टाईलने एक स्कुटर आणि एक दुचाकी वेडीवाकडी पद्धतीने पुढे आल्या. अचानक घडत असलेल्या प्रकाराने वर्दीतल्या अधिकाऱयाचीही भितीने गाळण उडाली. समोर दोन दुचाकी आल्याने कारचा वेग कमी केला. कार थांबल्याचे पाहून दुचाकीवरील त्या युवकांनी गाडीतून खाली कापसे यांना उतरवले. काठी आणि लाथाबुक्यांनी हल्ला चढवून कापसे यांच्याजवळील रोख 15 हजार रुपये व 9 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा सुमारे 24 हजार रुपयांचा ऐवज काढून घेत तेथून पोबारा केला. कापसे यांनी लगेच याबाबतचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला. गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांच्या सुचनेनुसार लगेच तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक खबऱयांमार्फत माहिती मिळाली. अशा दरोडय़ांचे प्रकार या परिसरात घडत असल्याचे समजले. त्यामध्ये गोंदवले बुद्रुकच्या ग्रामपंचायत सदस्यांचा मुलगा राहुल जयवंत शिरतोडे याचा व त्याचे चार साथीदारांचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जराड हे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेवून संशयितांच्या मागावर गेले. दहिवडी परिसरात रणजित धनाजी जाधव, शेखर दिलीप पाटोळे, शुभम दादा रणपिसे, सुभाष दादासो माने आणि राहुल शिरतोडे या पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून गुह्यातील रोखड आणि मोबाईल हस्तगत केला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जराड, सहाय्यक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार मोहन घोरपडे, उत्तम दबडे, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, रुपेश कारंडे, अर्जून शिरतोडे, विक्रम पिसाळ, सींज्चय जाधव, तानाजी माने, राम गुरव, विजय सावंत यांनी सहभाग घेतला होता. सर्व कर्मचाऱयांचे कौतुक पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी केले.