|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नाटक जगणारा चिरतरुण कलाकार

नाटक जगणारा चिरतरुण कलाकार 

जगन्नाथ मुळवी/ मडकई

 कलाकार हा चिरतरुण असतो. वयपरत्वे शरीर थकले तरी त्याच्यातील उत्साह  आटत नाही. खरं म्हणजे रंगभूमीवरील जुन्या आठवणीच त्यांच्या जगण्याचा आधार असतात. वयाची सत्तरी ओलांडलेले फोंडा येथील महादेव उर्फ आपा खानोलकर हे असेच एक चिरतरुण रंगकर्मी आहेत. बालनट म्हणून हौशी रंगमंचावर सुरु झालेला त्यांचा प्रवास आजही अखंडपणे सुरु आहे आणि त्याची झलक अधुनमधून पाहायला मिळते.

 महादेव उर्फ आपा खानोलकर यांच्या बोलण्यात रंगभूमी व नाटक हा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय. अभिनय करण्यात व नाटकावर बोलण्यास ते कधीही तयार असतात. कारण जीवनातील जे काही सुखद क्षण त्यांच्या वाटय़ाला आले ते रंगभूमीमुळेच ही त्यांची भावना. वयाच्या दहाव्या वर्षी फोंडा येथील श्री भुमिपुरूष प्रासादिक नाटय़ मंडळाच्या माध्यमातून त्यांनी प्रथम नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. या संस्थेच्या आकाशवाणीवरील सादरीकरणात बालनट म्हणून त्यांना संधी मिळाली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले व पुढील सहा दशके ते सशक्त कलाकार, निर्माते, दिग्दर्शक अशा विविध भूमिकामधून रंगभूमीशी कायम जोडले गेले. आपल्या तरूणपणी त्यांनी अपराध मीच केला, डॉ. कैलास, स्वार्था तुझं नावं माणूस, वाहतो ही दुर्वांची जुडी, काळं बेट लाल बत्ती, तन माजोरी, अश्रुंची झाली फुले, वेगळं व्हायचंय मला, फुलाला सुगंध मातीचा अशी एकाहून एक अजरामर नाटके हौशी आणि स्पर्धात्मक रंगभूमीवरून सादर केली.

 1982 साली कला अकादमीच्या नाटय़स्पर्धेत ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ हे नाटक कलावैभव नाटय़ संस्थेतर्फे सादर झाले. त्यावेळी या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले व पुढे पुण्यातील नाटय़स्पर्धेतही या नाटकाला सादरीकरणाची संधी मिळाली. त्यानंतर ‘काळं बेट लाल बत्ती‘ या नाटकातून आपांनी साकारलेली भोपेशास्त्राr ही भूमिका वैशिष्टय़पूर्ण ठरली. या भूमिकेसाठी त्यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. त्याच काळात आपा खानोलकर हे फोंडा पालिकेचे उपनगराध्यक्ष होते. सातारा येथील नाटय़स्पर्धेत भोपेशास्त्राrंची त्यांची भूमिका  पाहून त्याकाळचे सातऱयाचे नगराध्यक्ष शहाजी राजे भोसले यांनी आपांची भेट घेतली. खुद्द नगराध्यक्ष भेटीसाठी आल्याने आपांनी त्यांना बसायला सांगितले व आपण ही वेशभूषा उतरवून शहाजी राजांची भेट घेण्याची इच्छा दर्शविली. यावेळी शहाजी राजे भोसले यांनी आपण फोंडय़ाच्या उपनगराध्यक्षांना नव्हे, तर  भोपेशास्त्राrंना भेटायला आल्याचे सांगितल्याने आपांना कलाकारांचा मोठेपणा त्यावेळी जाणवला. ही अविस्मरणीय आठवण आपांनी जपून ठेवली आहे.

 आपांचे वडील सच्चीत खानोलकर हेही कलाकार होते. फोंडय़ाच्या विठोबा देवस्थानच्या उत्सवात ते वीरभद्र साकारत. त्यांच्याकडूनच या कलेचा वारसा आपांना मिळाला. वयाची साठी ओलांडूनही आपांमधील उत्साह अद्याप कायम आहे. नाटकाविषयी ते आत्यंतिक तळमळीने बोलतात. गोमंतकाची नाटय़परंपरा खूप जुनी आहे. गोमंतकातील बुर्जूग नाटय़कर्मी स्व. सुर्या वाघ, स्व. विश्वनाथ नाईक, स्व. बाबनी गांवकर, स्व. तातोबा वेलिंगकर, स्व. रघुवीरदादा नमशीकर, स्व. किशोर बोरकर, स्व. बाप्पा उर्फ पांडुरंग फडते, अशा अनेक कलाकारांनी ही रंगभूमी मोठी केली.  गद्य व संगीत अशा दोन्ही स्वरूपाची नाटके पाहिलेल्या आपांचे खरे प्रेरणास्थान हेच बुजुर्ग कलाकार आहेत.  त्याकाळी गावात एकाच रंगभूमीवरून पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक अशा प्रकारची पाच ते सहा मराठी नाटके सादर होत होती. मनोरंजनाचे व प्रबोधनाचे दुसरे साधन नसल्याने प्रेक्षकांची या नाटकांना तुडुंब गर्दी व्हायची. दर्जेदार नाटक पाहण्याचे खरे भाग्य गोमंतकीय प्रेक्षकांना त्यावेळी मिळाले. त्याकाळी नांदीलासुद्धा रसिक प्रेक्षक टाळय़ांनी उत्स्फूर्त दाद देत होते, अशा बऱयाच आठवणी आपांच्या बोलण्यातून ऐकायला मिळतात.

मराठी रंगभूमीला मरगळ कशी आली? याची काही कारणेही आपा सांगतात. बदलत्या काळात महागाई गगनाला भिडू लागली. त्यामुळे मराठी नाटकांना मरगळ आली. माणसाचे जीवन कामामुळे व्यस्त बनले. त्याचा परिणाम रंगभूमीवर झाला, आणि येथूनच कोकणी व्यावसायिक नाटकांना पेव फुटला. मात्र हौशी रंगभूमीवरून उदयाला कलाकारांना नाटकांच्या नावाखाली जे आज सुरु आहे, ते पटणारे नाही. मराठी नाटके लिहिणाऱया लेखकांना भाषेच ज्ञान होते. विषयाच्या तळाशी जावून ते सखोल अभ्यास करीत, मगच नाटय़संहिता लिहिल्या जात. नाटय़लेखन हा विषय एवढा सोपा नाही. त्याचा सखोल विचार होणे गरजेचे आहे, असे आपा यांचे स्पष्ट मत आहे.

संगीत नाटकाला उर्जितावस्था येणे आवश्यक असून माणसाला खरा आनंद देणारे हे संगीत नाटकातून अनुभवास येते. त्यासाठी पालकांनी मुलांना बालवयातच संगीत विद्यालयात पाठवायला हवे. नाटकांबरोबरच भजनी परंपराही टिकली पाहिजे असे ते सांगतात.

 नाटय़कलाकार कसा व कधी उदयाला येतो, यावर आपा खानोलकरनी दिलेली प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे. हौशी रंगभूमीला नटेश्वराचा आशिर्वाद आहे. ती टिकली तरच मराठी नाटक जगेल. हौशी रंगभूमीवरूनच कलाकार घडत असतो. त्यासाठी गावच्या जत्रौत्सवातून हौशी नाटय़कलाकारांना संधी मिळाली पाहिजे. कितीही खर्च आला तरी गावच्या युवकांना नाटक करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. नाटकात एकाहून अधिक स्त्रीपात्रे आजकाल परवडेनाशी झाली आहेत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असतो. साहित्यिक विष्णू वाघ यांनी जुन्या नाटकात थोडा बदल करून ती जशी रंगभूमीवर परत आणली, अशाच नाटकांच्या सादरीकरणामुळे परत एकदा रंगभूमीला चांगले दिवस येतील अशी आशा त्यांना वाटते.

Related posts: