|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भात उत्पादनवाढीचा ‘श्री’ मंत्र

भात उत्पादनवाढीचा ‘श्री’ मंत्र 

सावंतवाडी : कमी खर्चात जादा भात उत्पादनाचा श्रीमंत्र औरंगाबादच्या दिलासा जनविकास प्रतिष्ठानने शेतकऱयांना दिला आहे. गेल्या वर्षभरात जिल्हय़ात 270 गावातील 1516 शेतकऱयांनी श्री पद्धतीने 340 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करून भात उत्पादन घेतले आहे. अशा पद्धतीने लागवड केल्याने दुप्पट-तिप्पट उत्पादन मिळते. शेतकऱयांनीही अशा पद्धतीने भात लागवड केल्याने उत्पादन वाढल्याचा दावा करतानाच अशा पद्धतीने लागवड केल्यास भात बियाणेही कमी लागते. तसेच मजुरीचा खर्च वाचल्याचे सांगितले.

दिलासा जनविकास प्रतिष्ठान 24 वर्षापासून ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. ही संस्था पाणलोट विकास, पाणीपुरवठा योजना, भूजल संवर्धन, महिला बचतगटांचे संघटन व सक्षमीकरण, शेतकरी गटांची स्थापना असे कार्यक्रम राबवित असते. सिंधुदुर्ग जिल्हय़ात आर. बी. एल. च्या सहकार्याने भातवाढीचा श्री प्रकल्प संस्था राबवित आहे, या पद्धतीने लागवड केल्यास भात उत्पादनात वाढ होत असल्याचे दिलासा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनघा पाटील यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, भात उत्पादनवाढीसाठी श्री एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे. यात बियाणे, खते, किटकनाशके यांचा कमीत कमी वापर करून उत्पादन वाढविले जाते. पर्यावरणालाही धक्का पोहोचत नाही. तसेच भाताच्या कोणत्याही जातीसाठी ही पद्धत वापरू शकतो. सध्या 50 पेक्षा अधिक देशात श्री पद्धतीचा प्रसार झाला असून लक्षावधी शेतकऱयांनी या पद्धतीचा फायदा घेतला आहे. भारत, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, आंध्रप्रदेश, त्रिपुरा राज्यात या पद्धतीने लागवड होते.

महाराष्ट्रातही 1995 पासून या पद्धतीने काही भागात लागवड केली जाते. मात्र कोकणात या पद्धतीने लागवड केली जात नाही. युएनडीपीने किनारपट्टी भागात काही वर्षापूर्वी श्री पद्धतीची लागवड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रसार आणि प्रचार न झाल्याने लागवड मोठय़ा प्रमाणात झाली नाहे. सिंधुदुर्गात दिलासा संस्थेने गतवर्षापासून प्रचार-प्रसार सुरू केला. त्यासाठी तालुकावार कार्यालये स्थापून शेतकऱयांना श्री पद्धतीची लागवड करण्यासाठी प्रवृत्त करावे, यासाठी कर्मचारी नेमले. या पद्धतीमुळे खताची 25 टक्के तर पाण्याची 40 टक्के बचत होते आणि भात उत्पादनात दुप्पट वाढ होते. गुंठय़ाला कमीत कमी शंभर किलो तर जास्तीत जास्त दीडशे किलो भात मिळते, असे डॉ. पाटील म्हणाल्या. तसेच या पद्धतीसाठी हेक्टरी आठ किलो बियाणे लागते. याअंतर्गत शेतकऱयांना भात बियाणांचा पुरवठा करण्यात येतो. शुभांगी, कर्जत दोन भातबियाणे पुरविले जाते, असे पाटील यांनी स्पष्ट केले. भविष्यात सिंधुदुर्गात मेठय़ा प्रमाणात लागवड करण्यासाठी संस्थेचे
प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.

अशी करावी लागवड?

शेणखत आणि मातीचे थर देऊन गादी वाफा तयार करावा आणि रोपासाठी बी  पेरणी करावी. रोपाला दोन-तीन पाने आल्यावर 9 ते 15 दिवसांनी लागवड करावी. लागवडीत दोन रोपांमध्ये 20-25 सेमी अंतर ठेवावे. एकाजागी एकच रोप लावावे. सेंदीय खताचा वापर करावा, अशा पद्धतीची श्री लागवड आहे.

Related posts: