|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न 1.38 लाख

सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न 1.38 लाख 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे 2015-16 मधील वार्षिक दरडोई उत्पन्न 1 लाख 38 हजारावर पेहोचले आहे. राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालाद्वारे नुकतेच प्रत्येक जिल्हय़ाचे वार्षिक दरडोई उत्पन्न जाहीर केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हय़ाने औरंगाबाद, नाशिक या जिल्हय़ांना मागे टाकत सातवा क्रमांक पटकावला आहे. जिल्हय़ाच्या नव्या वार्षिक दरडोई उत्पन्नानुसार जिल्हय़ात माणसी दरमहा सरासरी 11 हजार 500 रुपये उत्पन्न घेतले जात आहे.

 राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर प्रत्येक जिल्हय़ाचे आर्थिक सर्वेक्षण करून जिल्हय़ाचे वार्षिक दरडोई उत्पन्न काढले जाते. आर्थिक सर्वेक्षण प्राथमिक, द्वितीय व तृतीय अशा तीन स्तरावर केले जाते. हे सर्वेक्षण करताना प्राथमिक स्तरावरील कृषी, वनसंवर्धन, मासेमारी आणि खाण व दगड खाणकाम यातून मिळणारे उत्पन्न काढले जाते. द्वितीय स्तरावर नोंदणीकृत उद्योग, विना नोंदणीकृत उद्योग, बांधकाम, गॅस व पाणी पुरवठा यातून मिळणारे उत्पन्न, तर तृतीय स्तरावर रेल्वे, परिवहन, दळणवळण, व्यापार, उपहारगृहे, बँका व विमा उद्योग, व्यवसाय सेवा, सार्वजनिक प्रशासन इतर सेवा यातून मिळणारे उत्पन्न अशा प्रकारे तिन्ही स्तरावर मिळणारे उत्पन्न एकत्रित करून जिल्हय़ाचे वार्षिक दरडोई उत्पन्न काढले जाते, त्याप्रमाणे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने प्रत्येक खात्याकडून 2015-16 चे आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार सिंधुदुर्गचे 2015-16 चे वार्षिक दरडोई उत्पन्न 1 लाख 38 हजार 279 रुपये असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे.

 माणसी 11,500 मासिक उत्पन्न

साडेआठ लाख लोकसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे वार्षिक दरडोई उत्पन्न 1  लाख 38 हजारावर पोहोचले आहे. म्हणजे माणसी 11 हजार 500 रुपये मासिक सरासरी उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात खाण, मासेमारी, आंबा, शेती व छोटे उद्योग यातून उत्पन्न मिळते. त्याचबरोबर आता जिल्हय़ात पर्यटन व्यवसाय बाळसे धरू लागला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायामधून चांगलेच उत्पन्न मिळू लागले आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या उत्पन्नात मोठी भर पडू लागली आहे.

 2020 मध्ये दोन लाखावर दरडोई उत्पन्न

सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे सन 2011-12 मध्ये वार्षिक दरडोई उत्पन्न 93 हजार 535 रुपये एवढे होते, आता चार वर्षांत 1 लाख 38 हजारावर पोहोचले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीचा चढता आलेख पाहता सन 2020 मध्ये निश्चितच वार्षिक दरडोई उत्पन्न दोन लाखावर पोहोचू शकते. भविष्यात मुंबई, ठाणे, पुणे या सारख्या मोठय़ा जिल्हय़ाशी स्पर्धा करू शकतो, हे दरडोई उत्पन्न वाढीवरून स्पष्ट होते.

 दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्ग सातवा

राज्यातील एकूण 34 जिल्हय़ांमधून सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा वार्षिक दरडोई उत्पन्नात सातवा क्रमांक लागला आहे. मुंबई प्रथम, ठाणे द्वितीय, पुणे तिसरा, नागपूर चौथा, रायगड पाचवा, कोल्हापूर सहावा आणि सिंधुदुर्गचा सातवा क्रमांक लागला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्गचा नववा क्रमांक होता. आता औरंगाबाद, नाशिक जिल्हय़ांना मागे टाकत सिंधुदुर्ग जिल्हा सातव्या क्रमांकावर वार्षिक दरडोई उत्पन्नात आला आहे.

 

  वार्षिक दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्गचा चढता आलेख

 

सन 2011-12                           93,535 रुपये

सन 2012-13                         1,05,775 रुपये

सन 2013-14                         1,18,476 रुपये

सन 2014-15                         1,28,133 रुपये

सन 2015-16                         1,38,279 रुपये

 

दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्ग सातवा

 

पहिले सात जिल्हे -सन 2015-16 चे वार्षिक दरडोई उत्पन्न

मुंबई               2,58,749 रुपये

ठाणे                2,17,094 रुपये

पुणे                 2,04,060 रुपये

नागपूर                        1,79,102 रुपये

रायगड                        1,73,279 रुपये

कोल्हापूर                     1,55,323 रुपये

सिंधुदुर्ग                       1,38,279 रुपये

Related posts: