|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणचा अव्वल ‘षटकार’

कोकणचा अव्वल ‘षटकार’ 

प्रतिनिधी / रत्नागिरी

कोकणच्या विद्यार्थ्यांनी सलग सहाव्या वर्षी राज्यात अव्वल स्थान पटकावून शिक्षणक्षेत्रात अव्वलतेचा दणदणीत ‘षटकार’ मारला आहे. कोकण विभागीय मंडळाने बारावी परीक्षेत 95.20 टक्के असा सर्वाधिक निकाल देत महाराष्ट्रात अग्रस्थान पटकावले आहे. यंदाही मुलींनी (97.34 टक्के) बाजी मारली आहे. कोकणात एकही कॉपीचे प्रकरण न सापडल्याने हे यश कॉपी विरहित असल्याने या यशाला निश्चितच दाद द्यावी लागेल. कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त माहितीनुसार, कोकण बोर्डात अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज रत्नागिरीची
विज्ञान शाखेतील मधुरा अविनाश मुकादम हिने 96.42 टक्के गुण प्राप्त करत अव्वल स्थान मिळवले आहे. खेडच्या ज्ञानदीप कॉलेजच्या शफक पटेलने वाणिज्य शाखेतून 94.31 टक्पेंसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. रत्नागिरीच्या अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेजच्या अनुष्का जैन हिने 90 टक्के गुण प्राप्त करत कला शाखेतून कोकणात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत कोकण विभागीय मंडळाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीचा निकाल बुधवारी 30 मे रोजी विभागीय अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. कोकण विभागात रत्नागिरीचा निकाल 94.49, तर सिंधुदुर्ग जिह्याचा 96.51 टक्के लागला आहे. गत पाच वर्षांप्रमाणेच यावर्षीही कोकण विभागात सिंधुदुर्ग जिह्याने बाजी मारली आहे. कोकण विभागाच्या शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा 97.44 टक्के, कला शाखेचा 89.74 टक्के, वाणिज्य 97.62 टक्के, तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल 95.71 टक्के लागला आहे. विज्ञान शाखा वगळता सर्व शाखांमध्ये कोकणाने इतर विभागांपेक्षा सरस कामगिरी केली आहे.

यावर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातून एकूण 32054 रजिस्टर्ड विद्यार्थ्यांपैकी 32039 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यामधून 30500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विज्ञान शाखेसाठी 8081 नोंद झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 8078 विद्यार्थी प्रविष्ठ झाले. तर त्यातील 7871 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी 9262 इतक्या विद्यार्थ्यांपैकी 9252 इतक्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. तर त्यापैकी 8303 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचप्रमाणे वाणिज्य शाखेसाठी 13008 नोंद झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 13006 विद्यार्थी प्रविष्ठ झाले, तर त्यामधून 12696 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 1703 विद्यार्थ्यांपैकी 1703 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 1630 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

रत्नागिरीमध्ये एकूण 20823 नोंद विद्यार्थ्यांपैकी 20811 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली व त्यामधून 19664 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिह्याचा 94.49 टक्के निकाल लागला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातून 11231 नोंदलेल्या विद्यार्थ्यांपैकी 11228 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी 10836 विद्यार्थी उत्तीर्ण होत सिंधुदुर्ग जिह्याने 96.51 टक्केवारी प्राप्त केली आहे.

रत्नागिरी जिह्यातून विज्ञान शाखेमध्ये 5362 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 5193 (96.85 टक्के) कला शाखेसाठी 6333 पैकी 5635 (88.98 टक्के), वाणिज्य शाखेमध्ये 8456 पैकी 8199 (96.96 टक्के) तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 660 विद्यार्थ्यांपैकी 636 विद्यार्थी (96.52 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिह्यातून विज्ञान शाखेसाठी 2716 पैकी 2678 (98.60 टक्के), कला शाखेसाठी 2919 विद्यार्थ्यांपैकी 2668 (91.40 टक्के), वाणिज्य शाखेसाठी 4550 विद्यार्थ्यांपैकी 4497 (98.84 टक्के) तर व्यवसाय अभ्यासक्रमातून 1043पैकी 993 विद्यार्थी (95.21 टक्के) यशस्वी झाले.

रत्नागिरी जिह्यामधून 10769 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 9919 विद्यार्थी (92.11 टक्के) तर 10042 विद्यार्थिनींपैकी 9745 (97.04 टक्के) तर सिंधुदुर्ग जिह्यातून 5736 पैकी 5460 विद्यार्थी (95.19टक्के) व 5492 विद्यार्थिनींपैकी 5376 विद्यार्थिनी (97.89 टक्के) उत्तीर्ण होत यशाची चढती कमान उंचावत ठेवली आहे.

प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक

कोकण बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या 30500 विद्यार्थ्यांपैकी 255 विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता तर तब्बल 12378 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. हे प्रमाण 49 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. द्वितीय श्रेणीमध्ये सुमारे 47 टक्के विद्यार्थी (14190) असून केवळ 1382 विद्यार्थ्यांना (4.53 टक्के) तृतीय श्रेणी मिळाली आहे.

64 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के

या परीक्षेसाठी रत्नागिरी जिह्यातून 148 कनिष्ठ महाविद्यालयांचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 32 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिह्यात एकूण 36 परीक्षा केंद्र होती. यावर्षी 6 नवी केंद्रे होती. सिंधुदुर्ग जिह्यात 95 कनिष्ठ महाविद्यालये, 23 परिरक्षक केंद्रे, तर 20 परीक्षा केंद्रे होती. सिंधुदुर्गमधील 95 महाविद्यालयांपैकी 28 महाविद्यालयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

30 मे रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका 9 जून रोजी संबंधित वितरण केंद्रावर प्राप्त होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परीक्षेला कोकण विभागीय मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, सचिव आर. बी. गिरी, उपसचिव चंद्रकांत गावडे उपस्थित होते.

2015 चा निकाल अद्यापपर्यंत अव्वल

2012 साली कोल्हापूर केंद्रातून स्वतंत्र करण्यात आलेल्या कोकण विभागीय मंडळाचा 2015 सालचा निकाल आतापर्यंत अव्वल राहिला आहे. यंदा गतवर्षीपेक्षा 4 टक्क्यांनी निकालाचा आलेख उंचावला आहे. 2012 साली कोकण विभागाने 86.25 टक्के, 2013 साली 85.88 टक्के, 2014 साली 94.85 टक्के, 2015 साली 95.68 टक्के, 2016 साली 93.29 टक्के आणि यंदा 95.20 टक्के निकाल देत राज्यात अव्वल टक्केवारी प्राप्त केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह त्यांचे शिक्षक, पालक यांचेही योगदान महत्वपूर्ण आहे.

मुलांपेक्षा मुलींची सरशी

कोकण विभागात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागातून एकूण 16505 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 15379 विद्यार्थी उत्तीर्ण (93.18 टक्के) झाले. 15379 विद्यार्थिनींपैकी 15121 विद्याथानी उत्तीर्ण होत (97.34 टक्के) मुलांपेक्षा 4.16 टक्के अधिक मुलींनी यशस्वीतेत बाजी मारली आहे.

गुण पडताळणीसाठी अर्ज करायची मुदत

गुण पडताळणीसाठी अर्ज करायची मुदत बुधवारी 31 मे ते शुक्रवारी 9 जून आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळाकडे बुधवारी 31 मे ते सोमवार 19 जूनपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

गुण पडताळणी अंतिम मुदत

ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे. त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर विहित नमुन्यात, विहित शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. इंटरनेवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणीसाठी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. गुण पडताळणीसाठी अर्ज करायची अंतिम मुदत गुरूवार 4 ते सोमवार 15 जूनपर्यंत आहे.

मराठी विषयाची सर्वाधिक टक्केवारी

कोकण विभागीय मंडळात यंदा मराठी विषयाला 99.25 इतकी सर्वाधिक टक्केवारी मिळाली आहे. ही निश्चितच विशेष बाब म्हणता येईल. रसायनशास्त्र 98.87 टक्के, जीवशास्त्र 98.82 टक्के, अकौंटन्सी 98.37 टक्के, भौतिकशास्त्र 97.38, हिंदी 97.65 टक्के, इंग्रजी 95.96 टक्के, अर्थशास्त्र 96.95 टक्के, तर गणित विषयाला 96.67 इतकी टक्के प्राप्त झाली आहे.

Related posts: