|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शेतकऱयांचे उत्पन्न नव्हे कर्ज दुप्पट झाले

शेतकऱयांचे उत्पन्न नव्हे कर्ज दुप्पट झाले 

आम्ही शेतकऱयांच्या प्रश्नासाठी राजकारण करतो. मात्र, भाजपने शेतकऱयांच्या

प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदेंच्या कार्यकाळात शेतकऱयांचे उत्पन्न नव्हे कर्ज दुप्पट झाले, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारला घरचा आहेर दिला. आमचा अंत पाहू नका. शेतकऱयांचा नाद कराल तर कायमचे बाद करून टाकू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आत्मक्लेश यात्रेचा मंगळवारी नवव्या दिवशी समारोप झाला. पुण्याहून मुंबईत दाखल झालेल्या आत्मक्लेश पदयात्रेचे भायखळा येथील राणीबागेच्या मैदानात सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आक्रमक शैलीत समाचार घेतला. आगामी काळात राष्ट्रीय स्तरावर शेतकरी नेत्यांना एकत्र करून केंद्र छाताडावर बसणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने नजीकच्या काळात स्वाभिमानी शेतकरी पक्ष हा एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने शेतमालाच्या संदर्भात डॉ. स्वामिनाथन् समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिलेच नव्हते, असे भाजपचे नेते आता बोलू लागले आहेत. भाजपने शेतकरी नेत्यांबरोबरच देशातील शेतकऱयांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे देशातील सर्व शेतकरी नेत्यांना केंद्र सरकारच्या  विरोधात एकत्र आणले जाईल, असे शेट्टी म्हणाले. केंद्र सरकार शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याने स्वामिनाथन आयोगाची गरज भासणार नसल्याचे केंद्रीय कृषि मंत्री सांगत आहेत. प्रत्यक्षात मोदी सरकारच्या काळात तुरीचा दर प्रति क्विंटल 11 हजार रुपयांवरून 5 हजार रुपयांपर्यंत खाली आला. पाकिस्तानातून कांदा आयात करून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱयांची राखरांगोळी केली, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना मोर्चाची परवानगी नाकारल्याने राणीबागेतील सभेनंतर शेट्टी हे मोजक्या सहकाऱयांसह पायी चालत राजभवनावर पोहचले. यावेळी शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना साडेसहा लाख शेतकऱयांच्या अर्जासोबत संघटनेच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

Related posts: