|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रमात प्रथमच ‘मालवणी’

मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रमात प्रथमच ‘मालवणी’ 

सिंधुदुर्ग : ‘वस्त्रहरण’ पुरत्या मर्यादित राहिलेल्या मालवणी बोलीला सन्मान देऊन या  मालवणी साहित्यावर संशोधन करता यावे व या साहित्याचा अधिक प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने प्रथमच आपल्या एस. वाय. बी. ए. च्या अभ्यासक्रमात मालवणी बोलीतील साहित्याचा समावेश करीत समस्त मालवणी बांधवांना सुखद धक्का दिला.

  एसवायबीएच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेल्या या साहित्यात आद्य मालवणी कवी वि. कृ. नेरुरकर, ज्येष्ठ मालवणी कवी ना. शि. परब, वसंत सावंत ते आजच्या पिढीसह एकूण बारा कवींच्या कवितांचा यात समावेश करण्यात आहे. प्रमाण भाषेला बोली भाषा समृद्ध करीत असताना आणि आजच्या बदलत्या काळात या बोलीभाषाच नष्ट होत चालल्या असताना मालवणी बोली टिकण्याच्या पार्श्वभूमीवर मालवणी भाषेच्या दृष्टीने ही महत्वाची उपलब्धी मानली जात आहे.

मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेला सुमारे दीड शतक होऊन गेले आहे. या एवढय़ा कालावधीत बोली साहित्याचा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कधी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता प्रथमच मालवणी बोली साहित्याचा समावेश करण्यात आहे. यात आद्य मालवणी कवी वि. कृ. नेरुरकर यांच्या गाजलेल्या ‘ठेय झिला घराची आठव रे’ तसेच ‘चल चेडवा पडावातसून आगबोटीत’ त्याच बरोबर कविवर्य वसंत सावंत यांच्या ‘आझान माझान आणि आराड गे बेडके सांन जांव दे’, ज्येष्ठ मालवणी कवी ना. शि. परब यांच्या ‘वाडवळ आणि झेटलीमन’, महेश केळूसकर यांच्या ‘व्हनीबाय जुन्यार दी गे’ आणि ‘बाळगो आणि मालग्या’, प्रवीण बांदेकर यांच्या ‘नया घराचो पावों खनताना’ आणि ‘वारुळ’, अजय कांडर यांच्या ‘शेताभातातलो शिरवान’ आणि ‘तांबेट पसरलेल्या माटवात’, नामदेव गवळी यांच्या ‘खेळे आणि भातालय’, सई लळीत यांच्या ‘वांगड’ आणि ‘शबय’, अविनाश बापट यांच्या ‘नामू कूळकार आणि मालवणी मेवो’, दादा मडकईकर यांच्या ‘जत्रा’ आणि ‘पावस ईलो पावस’, रुजारिओ पिंटो यांच्या ‘दर्या राजा’ आणि ‘माय’ व सुनंदा कांबळे यांच्या ‘तावडन आजी’ आणि ‘गटारी’ अशा वरील बारा कवांच्या प्रत्येकी दोन अशा एकूण चौवीस कवितांचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

  आतापर्यंत मालवणी भाषेला प्रमाण मराठी भाषेसमोर दुय्यम स्थान दिले जात होते. मुंबईसारख्या शहरात वावरताना प्रमाण मराठी भाषेतच बोलणे हे मालवणी माणसाला कोणे एकेकाळी प्रतिष्ठित वाटायचे आणि दोन मालवणी माणसे एकत्र आली, तरी ती मराठीतच बोलायची. मात्र नटवर्य मच्छिंद्र कांबळी यांनी ‘वस्त्रहरण’ हे मालवणी नाटक रंगमंचावर आणले आणि त्या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवायला प्रारंभ केल्यावर मालवणी बोलणे हेच मालवणी माणसाला प्रतिष्ठेचे वाटू लागले. त्यानंतर मात्र ही मालवणी बोली टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्याचे  दिसत नसतानाच आता थेट मुंबई विद्यापीठासारख्या राज्यातील अग्रगण्य विद्यापाठीने मालवणी साहित्याचा स्वतंत्र अभ्यासक्रमातच समावेश करीत मालवणी भाषेला विशेष गौरव व सन्मान प्राप्त करून दिला आहे.

महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘अहरानी बोली’ बरोबरच इतर बोली साहित्याचा समावेश आजवर करण्यात आला होता. पण मालवणी बोली साहित्याचा आजवर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला नव्हता. आता तो  मुंबई विद्यापीठाच्या एसवायबीएच्या अभ्यासक्रमात करण्यात आला असताना त्याचा स्वतंत्र पेपर तयार करण्यात येणार आहे. जून-जुलैच्या दरम्यान मालवणी साहित्य अभ्यासक्रमाचा स्वतंत्र ग्रंथही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जागतिकीकरणात माणसाच्या भाषा संवादावर परिणाम झाला आहे. शिक्षणाचे संदर्भ बदलल्यामुळे जगण्याचे संदर्भही बदलले. लोकसंस्कृतीतून भाषा संस्कृतीचा  विकास होत असतो. पण लोकसंस्कृतीवरच परिणाम झाल्याने बोली भाषाच अडचणीत आल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या संशोधनानुसार गेल्या काही वर्षांत 220 बोली नष्ट झाल्या. त्यामुळे आपापली बोली टिकविण्याचे सर्वत्र प्रयत्न होत असतानाच्या या काळात आता मालवणी बोली साहित्याचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्वतंत्र समावेश करण्यात आला, ही घटना मालवणी बोलीला चालना देणारी आहे.

हा मालवणी बोलीचा सन्मान – गोविंद काजरेकर

  मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी मालवणी कवितांची निवड करणाऱया उपसमितीचे प्रमुख डॉ. गोविंद काजरेकर (बांदा कॉलेजचे प्राध्यापक) असून या समितीत फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सतीश कामत व देवगड महाविद्यालयाचे प्राध्यापक वसंत भोसले यांनी सदस्य म्हणून योगदान दिले आहे. एकंदर मालवणी बोलीला हा सन्मान देण्यामागची विद्यापीठाची भूमिका विषद करताना काजरेकर म्हणाले,  मालवणी लोकसंस्कृतीवर आजवर संशोधन करण्यात आले. पण आजवर मालवणी साहित्यावर विद्यापीठ पातळीवर स्वतंत्र संशोधन करण्यात आले नव्हते. मात्र आता मालवणी साहित्याचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्यामुळे   यापुढे मालवणी बोली साहित्यावर स्वतंत्र संशोधन करण्याला चालना मिळणार आहे. एखाद्या अभ्यासक्रमात मालवणी बोलीच्या कवितांचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ असून बोलीभाषा संवर्धनाचा हा एक अतिशय सुंदर प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मालवणीबरोबरच आग्री व वाडवाळी या आणखी दोन बोलींचाही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असल्याचे काजरेकर यांनी सांगितले.