|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » यावर्षीही प्रवाशांना पावसातच भिजावे लागणार..

यावर्षीही प्रवाशांना पावसातच भिजावे लागणार.. 

वार्ताहर/ कराड

अनेक वर्षांपासून रखडलेल्या कराडच्या नवीन बसस्थानक इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारास 31 मेची डेडलाईन दिली होती. त्यामुळे किमान यावर्षी तरी प्रवाशांना पावसाळ्यात निवारा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, 31 मेची डेडलाईन संपली तरी इमारतीचे काम पूर्ण झाले नसल्याने यावर्षीही प्रवाशांना पावसात भिजावे लागणार असल्याचे दिसत आहे.

कोकण व घाटमाथ्याला जोडणारे तसेच पुणे-कोल्हापूरच्या मध्यावर असणारे कराड हे महत्वाचे बसस्थानक मानले जाते. दररोज या बसस्थानकातून हजारो प्रवासी प्रवास करतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराडला नवीन बसस्थानकाची इमारत बांधण्यासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला व तातडीने कामही सुरू झाले. मात्र, जुन्या बसस्थानकात असलेल्या स्टॉलधारकांच्या विरोधामुळे अनेक दिवस हे काम रखडत पडले.

मुळातच नवीन बसस्थानक इमारत बांधावयाची असल्याने एसटी प्रशासनाने जवळपास पाच वर्षांपासून येथील सोयी-सुविधांसाठी निधी देणे बंद केले होते. त्यामुळे कराडचे बसस्थानक हे गैरसोयींचे आगार बनले आहे. बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना साधे प्यायला पाणीही मिळत नाही.

नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडल्यापासून येथील प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बसस्थानकातील ड्रेनेज व्यवस्था मोडकळीस आली असून वारंवार ड्रेनेजचे पाणी बसस्थानकाच्या आवारात पसरत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या काळात प्रवाशांचे होणारे हाल थांबवण्यासाठी एसटी प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला 31 मेपर्यंत बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, 31 मेची डेडलाईन संपली तरी अद्याप बसस्थानकाचे काम पूर्ण झालेले नाही.

Related posts: