|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » काबुल हल्ल्यात 1500 किलो स्फोटकांचा वापर

काबुल हल्ल्यात 1500 किलो स्फोटकांचा वापर 

अफगाण हेरयंत्रणेचा दावा : हल्ल्यामागे आयएसआयचा हात

वृत्तसंस्था/ काबुल

 अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात 1500 किलोग्रॅम एवढय़ा वजनाची स्फोटके वापरण्यात आली होती. पाकिस्तानची हेरयंत्रणा आयएसआयच्या मदतीने हा हल्ला हक्कानी नेटवर्कने घडवून आणल्याचा आरोप अफगाणची हेरयंत्रणा नॅशनल सिक्युरिटी डायरेक्टोरेटने (एनएसडी) केला आहे. या हल्ल्यात 90 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले
आहेत.

2001 सालानंतर काबुलमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नागरिकांचे बळी घेणारा हा पहिलाच हल्ला आहे. याआधी जुलै 2016 मध्ये काबुलमध्ये निदर्शने करणाऱया शिया मुस्लिमांवर आत्मघाती हल्ला झाला होता. यात 85 जणांचा मृत्यू झाला होता आणि 230 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. आयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

भारतीय दूतावासानजीकच स्फोट

बुधवारी करण्यात आलेला स्फोट भारतीय दूतावासापासून फक्त 100 मीटरच्या अंतरावर झाला होता. या हल्ल्याकरता वापरण्यात आलेली स्फोटके एका टँकरमध्ये भरली गेली होती. स्फोटामुळे परिसरातील अनेक देशांचे दूतावास आणि घरांच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आणि दरवाजे निखळून पडले. 50 पेक्षा अधिक वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

ट्रम्प, मोदींकडून हल्ल्याची निंदा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्याशी चर्चा करत या हल्ल्याची निंदा केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याची निंदा करत दहशतवादविरोधी लढय़ासाठी भारत अफगाणिस्तानसोबत उभा असल्याचे म्हटले.

मागील वर्षी सर्वाधिक बळी

युनायटेड नेशन्स असिस्टन्स मिशन इन अफगाणिस्तानच्या अहवालानुसार मागील वर्षी अफगाणिस्तानात झालेल्या हल्ल्यांमध्ये 3498 नागरिकांचा मृत्यू झाला. 7920 जण जखमी झाले. मागील 8 वर्षांमध्ये हा आकडा सर्वाधिक होता. 2015 च्या तुलनेत यात 2 टक्के वाढ दिसून आली. अहवालानुसार या वर्षी मार्चंपर्यत अफगाणिस्तानात हवाई हल्ले आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये 715 जणांचा मृत्यू झाला असून 1466 जण जखमी झाले आहेत.

Related posts: