|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मान्सूनपूर्व पावसाने 29 गावांची वीज गुल

मान्सूनपूर्व पावसाने 29 गावांची वीज गुल 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ात बुधवारी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा अनेक गावांना बसला आहे. कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ले या चार तालुक्यातील 29 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत आणि कोकिसरे शाळा इमारतीची भिंत कोसळून सहा लाख 66 हजार रुपयांचे नुकसान झाले.

जिल्हय़ात बुधवारी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार कोसळला. 66.17 मि. मी. च्या सरासरीने एकूण 529.4 मि. मी. पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस दोडामार्ग तालुक्यात 110 मि. मी., सावंतवाडी 44 मि. मी., कणकवली 78 मि. मी., देवगड 50 मि. मी., वैभववाडी 20 मि. मी. झाला.

जिल्हय़ात पावसाळी हंगामात वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्याचे वीज महावितरणच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले होते. परंतु पावसाळा सुरू होण्याआधीच मान्सूनपूर्व पावसात 29 गावांची वीज गुल होऊन 24 तासात वीजपुरवठा सुरळीत होऊ न शकल्याने महावितरणची पोलखोल झाली आहे.

महावितरणच्या कुडाळ उपविभागीय कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुडाळ तालुक्यातील सांगिर्डेवाडी, केसरकरवाडी, उद्यमनगर, कवठी, सोनवडे, तेंडोली, हुमरमळा, आंदुर्ले, वाडोस, घोडगे, जांभवडे, दोडामार्ग तालुक्यातील मांगेली, तळेखोल, विर्डी, घारपी, फुकेरी, उगाडे, कुंब्रल, आयनोडे, भिकेकोनाळ, सावंतवाडी तालुक्यातील चराठा, वाफोली, भालावल, रोणापाल, इन्सुली, वेंगुर्ल्याच्या अखत्यारितील नेमळे, कामळेवीर, मोचेमाड, आसोली याप्रमाणे कुडाळ तालुक्यातील 11, दोडामार्ग – 8, सावंतवाडी – 6, वेंगुर्ले – 4 याप्रमाणे 29 गावात वीजपुरवठा गुल झाला आहे.

वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे प्राथमिक आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत कोसळल्याने पाच लाखाचे नुकसान झाले आहे. तर कोकिसरे शाळा इमारतीची भिंत कोसळल्याने 1 लाख 66 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाल्याला पूर आल्याने भंगार वाहून गेले आहे.

 अतिवृष्टीचा इशारा

कोकण किनारपट्टी व गोवा राज्यात काही ठिकाणी पुढील 24 तासात अतिवृष्टी होऊ शकते. तसेच पाच जूनला अतिवृष्टी होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

Related posts: