|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेच्या उच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी भारतीयाची नियुक्ती

अमेरिकेच्या उच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी भारतीयाची नियुक्ती 

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेतील भारतीय वंशाचे विधीज्ञ अमुल थापर यांची अमेरिकेच्या सर्वोच्च अशा अपीलीय न्यायालायाच्या न्यायाधिशपदी निवड करण्यात आली आहे.  अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अपीलीय न्यायालयाच्या सहाव्या खंडपीठपदी थापर यांची नियुक्ती केल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे.

अपीलीय न्यायालयातील नियुक्तीपुर्वी थापर केंटुके राज्याच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर कार्यरत होते.  48 वर्षीय थापर यांच्या नावावर गत आठवडय़ात अमेरिकी सिनेटने 52-44 या मताधिक्यांने मोहर उमटवली. भारतातून अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या कुटुंबात जन्म घेतलेले थापर हे अमेरिकेच्या आर्टीकल-3 स्तरापर्यंत पोचलेले दक्षिण आशियाई वंशाचे पहिले न्यायाधिश ठरले आहेत. थापर यांनी आपल्या व्यावसायीक कारकीर्दीची सुरूवात खासगी वकिलीच्या माध्यमातून केली. ओहियोच्या दक्षिणी जिल्हय़ातील जिल्हा न्यायालयातील न्या. एस. आर्थर स्पीगेल आणि अपीलीय न्यायालयाचे माजी न्या. नील गोरसक यांचे सहाय्यक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी  2010 साली अमेरिकेच्या बार असोशिएनकडून देण्यात येणाऱया मानाच्या ‘पायोनियर ऍवार्ड’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. थापर यांनी प्रसिद्ध बोस्टन कॉलेजमधून पदवीपूर्व तर बर्कलेस्थित कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातून कायदय़ाचे शिक्षण घेतले. ते नेहमीच अभ्यासू विद्यार्थी म्हणून गणले गेले आहेत. त्यांनी आपल्या वकीली कार्यकाळात अनेक अवघड प्रकरणे कौशल्याने हाताळली आहेत. ट्रंप यांनी शुक्रवारी 10 न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यात थापर यांचा समावेश आहे. ट्रंप यांची राजवट अमेरिकेत सुरू झाल्यापासून उच्चपदी नियुक्त करण्यात आलेले ते चौथे भारतीय आहेत.