|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सून उंबरठय़ावर

मान्सून उंबरठय़ावर 

पुणे / प्रतिनिधी

नैत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरामच्या उर्वरित भागात तसेच त्रिपुरा, आसाम व मेघालयाच्या बहुतांश भागात सक्रिय झाला आहे. कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक आणि रायलसीमेच्या काही भागात तसेच तामिळनाडूत पुढील 48 तासात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण असून, येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची, तर मध्य महाराष्ट्रात सोसाटय़ाच्या वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्यात सर्वांत जास्त तापमान ब्रम्हपुरीत 42.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 5 जूनला ?

केरळात नियोजित वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल सुरळीतपणे सुरू आहे. मान्सूनने ईशान्येतील राज्ये व्यापली असून, कर्नाटकच्या दिशेनेही आगेकूच केली आहे. येत्या 48 तासांत तो मध्य अरबी समुद्र, दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टीसह रायलसीमा, तामिळनाडूच्या काही भागांत दाखल होईल, अशी चिन्हे आहेत. मान्सूनची वाटचाल अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातही तो 5 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज आहे.

Related posts: