|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कातकरी समाजाने मुख्य प्रवाहात येणे गरजेचे!

कातकरी समाजाने मुख्य प्रवाहात येणे गरजेचे! 

विजयदुर्ग : कातकरी समाजातील ज्या लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळाली आहेत, त्यांनी समाज बांधवांच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे. सकारात्मक मानसिकतेने कातकरी समाजातील बांधवांनी विकासाचे धोरण अवलंबिले पाहिजे. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले.

देवगड तालुक्यातील सौंदाळे केरपोई येथे शबरी आवास योजनेंतर्गत कातकरी समाजातील पंधरा लाभार्थ्यांना बांधून देण्यात आलेल्या घरकुलांचा लोकार्पण सोहळा शनिवारी जिल्हाधिकारी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कातकरी समाजातील लाभार्थ्यांना चौधरी यांच्या हस्ते घरकुलांच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी सुनील रेडकर, देवगड पं. स. सभापती जयश्री आडिवरेकर, उपसभापती संजय देवरुखकर, तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले, पं. स. सदस्य अजित कांबळे, रवींद्र तिर्लोटकर, आदिवासी नेते उदय अहीर आदी उपस्थित होते.

भटकंती करणाऱया या समाजाला आज खऱया अर्थाने हक्काची घरे मिळाली आहेत. यासाठी गटविकास अधिकारी चव्हाण व तहसीलदार सौ. पाटील यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, असे गौरवोद्गार चौधरी यांनी काढले.

कातकरी समाजही आदर्शवत ठरेल

मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह म्हणाले, कातकरी समाज हा स्थिर नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मात्र, या समाजाला हक्काची घरे मिळाल्यानंतर विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. भविष्यात विकासात्मकदृष्टय़ा स्वतःमध्ये परिवर्तन करून हा समाज आदर्शवत झालेला दिसून येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सुनील रेडकर, तहसीलदार सौ. पाटील, गटविकास अधिकारी चव्हाण, सभापती आडिवरेकर, उपसभापती देवरुखकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कातकरी समाजातील लाभार्थी वसंत सखाराम निकम, अभय रामू पवार, बाबू रामू पवार, नागेश बबन पवार, कृष्णा पुंडलिक पवार, इंदिरा शिवराम पवार, दीपक नारायण पवार, मधु आत्माराम पवार, अनिल वसंत निकम, लक्ष्मण सुरेश निकम, रवींद्र अनंत निकम, उमेश अनंत निकम, गीता शांताराम पवार, पार्वती महादेव निकम, सुरेश महादेव निकम यांना घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले.

अन् ‘निर्मल’ भावूक झाली…

कातकरी समाजातील विद्यार्थिनी निर्मल पवार म्हणाली, मित्रमैत्रिणींच्या घरी जाताना आम्हाला घर कधी मिळणार, असा प्रश्न पडायचा. त्यामुळे शासनाने दिलेली घरे ही आम्हाला देवदूतांप्रमाणेच आहेत. आमच्या आकांक्षा व इच्छाशक्ती प्रबळ करणाऱया या घरांमुळे आमचे स्वप्न पूर्ण पूर्ण झाले. या घरांच्या माध्यमातून विकास प्रक्रियेत सामील होऊन समाजाची उन्नती साधण्याचा प्रयत्न निश्चितच आम्ही करू, असे सांगतानाच निर्मल भावूक झाली.