|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पारंपरिक मच्छीमारांच्या अटकेवेळी राणे कुठे होते?

पारंपरिक मच्छीमारांच्या अटकेवेळी राणे कुठे होते? 

मालवण : पालकमंत्री असतांना पर्ससीनधारकांनी बाजू घेतल्याने नारायण राणेंवर आज घरी बसण्याची वेळ आली. पारंपरिक मच्छीमारांना अटक झाली तेव्हा राणे कुठे होते? यावरूनच राणेंचे पारंपरिक मच्छीमारांवर असणारे प्रेम हे पुतनामावशीचे प्रेम असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

 या पत्रकात नाईक पुढे म्हणतात की, गेली 25 वर्षे राणे सत्तेत होते, त्यावेळी धनदांडग्या पर्ससीन नेटच्या बाजूने निर्णय घेत पारंपरिक मच्छीमारांवर सातत्याने अन्यायच केला. नारायण राणे पालकमंत्री असताना त्यांनी पर्ससीनधारकांच्या बाजूने केलेली वक्तव्ये तपासावीत. आचरा येथे वाद झाला तेव्हा मी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने होतो. त्यावेळी पारंपरिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राणेंनीच केली. तसेच पर्ससीनधारकांची भेट घेऊन मी तुमच्या पाठीशी आहे, असे वक्तव्य राणेंनीच केले होते. मी आमदार झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात विधानसभेत आवाज उठवला. माझ्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर एम. पी. डी. ए. कायदा लागू करून पर्ससीनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदी आणली. गेल्या वर्षभरात मत्स्योत्पादन वाढल्याचे राज्यपालांच्या अभिभाषणात नमूद करण्यात आले.

      फयागग्रस्तांचे पैसे मागे का गेले?

मी माझ्या वडिलांचा व्यवसाय अत्यंत इमानाने चालवत असून राणे माझ्यावर बेईमानी ठेकेदार असा आरोप करत आहेत. आता दोन वर्षाच्या कालावधीत शासनाने ई-निविदा केल्याने ठेकेदारांवर आळा बसल्याने कोणाचे हप्ते बंद झाले, हे लोकांना माहिती आहे. परिणामी लोकही चांगल्या दर्जाची कामे करून घेत आहेत. नारायण राणेंच्या पुत्रावर सांताप्रुझ येथील एस्टेला हॉटेलचे मालक हितेश केसवानी यांनी काय आरोप केले, हे राणेंनी प्रत्यक्ष पाहावे. राणे पालकमंत्री असतांना फयान ग्रस्तांचे पैसे मागे का गेले, असाही सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.

        25 वर्षांनी जाग आली!

25 वर्षात मालवणमधील वीज समस्येवर राणेंनी काय उपाययोजना केली? गेल्या दोन वर्षात वीज समस्येच्या मुळाशी जाऊन मालवणमध्ये वीज उपकेंद्र मंजूर केले. जिल्हा नियोजनमधून देवबाग-तारकर्ली थ्री-फेज लाईन करून उपाययोजना केली. मालवणला आचऱयावरून नवीन विद्युत प्रवाहाची उपलब्धता केली. तसेच मालवण उपकेंद्राचे काम आता सुरू झाले आहे. मालवणमध्ये भूमिगत 15 किमी एस.टी. लाईनसाठी 2 कोटी 40 लाख व एल. टी. लाईनसाठी 97 लाख निधी आम्हीच मंजूर करून घेतला. तसेच मालवण तालुक्यात 17 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले. दहा  ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविली. या सर्व कामांमुळे येत्या दोन ते तीन महिन्यात मालवणमध्ये विजेचा प्रश्न सुटणार आहे.