|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘शिवराज्याभिषेक’ राष्ट्रीय सण व्हावा!

‘शिवराज्याभिषेक’ राष्ट्रीय सण व्हावा! 

 युवराज संभाजीराजे छत्रपती यांची अपेक्षा

रायगडावर उसळला शिवभक्तांचा सागर

गड संवर्धन व विकासास याच महिन्यात प्रारंभ

चंद्रकांत कोकणे /किल्ले रायगड

दुर्गराज रायगडावर मंगळवारी लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत 344 वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा दिमाखात साजरा झाला. भिरभिरणारे भगवे ध्वज, जय जिजाऊ-जय शिवरायचा अखंड जयघोष, रंगबिरंगी फेटे-बाराबंदी-नऊवारी साडय़ा अशा पारंपारिक वेशभूषेतील अबालवृध्द शिवभक्त-इतिहासप्रेमीच्या उपस्थितीने रायगडावर शिवराज्य उभे राहीले. दरवर्षी या सोहळय़ासाठी उसळणारा जनसागर म्हणजे हा सोहळा आता लोकोत्सव झाल्याची पोचपावती असून आता हा महोत्सव राष्ट्रीय सण व्हावा अशी अपेक्षा खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर याच महिन्यात रायगड संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रायगडः राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती आणि शंभूराजेंच्या पालखी मिरवणुका.

रायगडः राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती आणि शंभूराजेंच्या पालखी मिरवणुका.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे 5 व 6 जून या कालावधीत रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोमवारी पारंपारिक कार्यक्रम व उपक्रमांबरोबरच ‘संवर्धन रायगडाचे…मत शिवभक्तांचे’ या परिसंवामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून एक विचार जनमानसात रुजला. मंगळवारी पहाटे ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात जाली. इचलकरंजीच्या शिवभक्तांकडून नगारखान्यासमोरील भव्य ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती घराण्यांचे राजपुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारांत विधीवत पुजन करण्यांत आले. गंगा, कृष्णा, कावेरी, सावित्री आदी सप्त नद्याचे जल आणि दुधाने शिवरायांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यांत आला. त्या नंतर शिवछत्रपतींचे चौदावे वंशज व गडकोट-किल्ल्यांचे बॅण्ड ऍम्बेसिडर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मेघडंबरींतील छ.शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांनी अभिषेक केला आणि शिवभक्तांनी शिवनामाचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी शहजीराजे छत्रपतीही उपस्थित होते. दोघांनी तलवार उंचावत लाखोंच्या संख्येने गडावर जमलेला शिवभक्तांना अभिवादन केले.

दिमाखदार पालखी सोहळा

राजसदरेवरील या मुख्य सोहळ्यानंतर राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालखी मिरवणूका काढण्यात आल्या. राजसदरेवरून नगारखान्या मार्गे पालखी बाहेर पडली. होळीचा माळ येथे गेल्यानंतर शिवपुतळ्यासमोर शिवकालीन युध्दकला, ढोलताशा पथके, ‘बादल’ व ‘प्रिन्स’ या घोडय़ांचे अभिवादन, लेझीम-मल्लखांब आदी कलागुणांचे सादरीकरण झाले. यानंतर मिरवणूक बाजारपेठ मार्गे जगदिश्वर मंदीराकडे रवाना झाला. जगदिश्वर मंदीरात पूजनानंतर पालखी मिरवणूकीची सांगता शिवछत्रपतींच्या समाधीजवळ झाली.

राजसदरेवर आयोजित कार्यक्रमाला जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे ,समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख,राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहूल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखारे आदीउपस्थित होते.

किल्ले सवंर्धनासाठी आग्रही

उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करताना युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी मुंबईजवळ अरबी समुद्रामध्ये महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यांत येत आहे हि अतिशय आनंदाची बाब आहे. मात्र महाराजांचे जीवंत स्मारक असलेले गडकिल्ले तेवढेच महत्वाचे असून सर्वप्रथम त्यांचे संवर्धन झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. किल्ले रायगडाचे संवर्धनाच्या कामा बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रायगडच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच राजगड, सिंधदुर्ग, पन्हाळा या किल्ल्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमाफीसाठी नेत्यांनी एकत्र यावे

सर्वांचा पोशींदा असलेल्या शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी राज्यातील सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे व यातून सर्वसमावेशक ठोस मार्ग काढवा असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. गेल्या काही वर्षांत शेतकऱयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी प्रश्नात राजकारण न करता सर्वांनी शेतकरी हित जपण्याची गरज आहे. मोठय़ा बोक्यांना कर्जमाफी न देता सर्वसामान्य व गरजू शेतकऱयांची कर्जमाफी व्हायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा

आरक्षण हा मराठय़ांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायला हवा त्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे आपण स्वतः 12 बलुतेदार व 18 पगड जातींसह बहुजन समाजाचे नेतृत्व करत सर्वांना बरोबर घेवून या पुढील काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चालू महिन्यातच रायगड संवर्धनास प्रारंभ…

राज्य शासनाने रायगडसाठी 606 कोटींचा संवर्धन व विकासाचा सर्वांगिण आराखडा तयार केला आहे. या कामाची प्रत्यक्ष सुरुवात याच महिन्यातच शिवभक्तांच्या उपस्थितीत केली जाईल. आराखडय़ानुसार प्रत्यक्ष किल्ल्यासाठी 125 कोटी, महाड-रायगड रस्त्यासाठी 200 कोटी रुपये, जिजाऊ वाडय़ासाठी 70 ते 80 कोटी, रायगडाच्या पंचक्रोशीतील वाडय़ा-वस्त्यांतील मुलभूत सुविधांसाठी पावणे दोन कोटींच्या खर्चाचा समावेश आहे. रायगड संवर्धनासाठीच्या या कार्यात वर्षातील किमान दोन दिवस शिवभक्तांनी ‘शिवकार्य’ म्हणून श्रमदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शिवभक्तांच्या सुचनांनुसारच आराखडा ः देशमुख

रायगड महाराष्ट्राचा अनमोल ठेवा असल्याने त्याचे जतन करणे अत्यावश्यक आहे. गडावरील सर्व वास्तूंची तज्ञांमार्फत पाहाणी करून सर्वांगिण आराखडा तयार केला आहे. शासनाने 47 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली असून त्यातील 7 कोटी रुपये जिल्हधिकार्यांकडे उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात शिव समाधी, राजदरबार, राजवाडा, जगदिश्वर मंदीर, सप्तमनोरे व पाचाडचा जिजाऊ वाडा यांचा समावेश आहे. रागडावरील 3 तलाव व 86 पाण्याच्या टाक्या यांची गाळकाढून स्वच्छता करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाची विशेष मान्यता घेवून रायगडाच्या संवर्धनाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाची 30 अभियंते उपलब्ध करून दिल्याची माहिती कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

शिवराज्याभिषेक गीताने जिंकली मने…

मना-मनात एकच धुन-फक्त-अन फक्त 6 जून अशा भावनेने रायगडावर होणाऱया शिवराज्याभिषेक सोहळ्यास देशाच्या विविध राज्यांसह परदेशातील शिवभक्तही उपस्थित राहातात. असा हा स्फूर्तीदायी सोहळा अविस्मरणीय बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शाहिर परिषद व कोल्हापूर जिल्हा शाहिर परिषदेच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक गीताचे सादरीकरण’ करण्यात आले. खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखली युवराज्ञी संयोगीताराजे यांच्या संकल्पनेतून या गीताची निर्मीती करण्यात आली आहे. शाहिर आझाद नायकवडी, दिलीप सावंत, सुरेश जाधव, राजेंद्र कांबळे, संजय गुरव, आलम बागणीकर यांच्यासह त्यांच्या पथकांनी रायगडावरील राजसदरेत एकत्रीत या गीताचे गायन करून उपस्थितांची मने जिंकली. “राज्याभिषेक सोहळ्याचा घुमू दे जय-जयकार शिवछत्रपती झुंजार…6 जून 1674 भाग्यशाली घटना घडली, महाराष्ट्र भूमी हर्षीत झाली, छत्रपती साकार …’’ अशा स्वरुपाचे हे गीत आहे.

1200 किलो फुलांची सजावट

रायगडावरील आकर्षक पुष्क सजावट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. राजसदर आणि शिवपुतळ्याची अतिशय सुंदर पुष्प सजावट करण्यात आली होती. राजसदरावरील मेघडंबरी आणि मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फुलांनी सजविण्यात आला होता. गेली दोन वर्षे पुण्यांतील दगडूशेट हलवाई ट्रस्ट मार्फत ही सजावट केली जाते. पुण्यांतील शिवभक्त सुभाष सरपाले यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या या सजावटीसाठी 1200 किलो फुलांचा वापर करण्यात आला.

वाहतुकीचे नेटके नियोजन

दरवर्षी रायगडावर होणाऱया शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यांतुन लाखो शिवभक्त गडावर उपस्थिती लावतात,बसेस,खाजगी वाहाने,छोटी वाहाने,मोटारसायकल यांची संख्या प्रचंड असते.त्यांतुन वाहातुकीची कोडी होते.परंतु यावर्षी पोलिसांनी वाहातुकीची अतिशय नियोजन बध्द व्यवस्था ठेवल्याने सोहळ्याला येणाऱया शिवभक्तांना कोणताही त्रास सहन करावा लागला नाही.सर्व वाहाने पाचाड येथेच थांबविण्यांत आली होती त्या प्रमाणे वाहान तळ तयार करण्यांत आले होते.फक्त अति महत्वाच्या व्यक्तींची वाहाने रोपवे पर्यत सोडण्यांत आली.